सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू; माटुंगा येथील महर्षी कर्वे उद्यानात खेळताना दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 12:25 PM2024-03-19T12:25:35+5:302024-03-19T16:06:47+5:30
अंकुश आणि अर्जुन वाघरी अशी या भावंडांची नावे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उद्यानामध्ये खेळायला गेलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना माटुंगा येथील महर्षी कर्वे उद्यानात (वन गार्डन) घडली. अंकुश आणि अर्जुन वाघरी अशी या भावंडांची नावे असून, ती अनुक्रमे चार आणि पाच वर्षांची आहेत. यासंदर्भात रफिक अहमद किडवई मार्ग पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वडाळा रोड परिसरात मनोज वाघरी वास्तव्यास आहेत. कपड्यांवर भांडी आणि प्लास्टिकच्या वस्तू विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. रविवारी सकाळी ते कामासाठी बाहेर पडले असता अंकुश आणि अर्जुन ही त्यांची दोन्ही मुले खेळण्यासाठी बाहेर पडली. बराच वेळ झाल्याने ती परत न आल्याने आई-वडिलांनी त्यांचा खूप शोध घेतला. परंतु ते न सापडल्याने मनोज वाघरी यांनी माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
माटुंगा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही मुले वन गार्डनमध्ये जाताना दिसली. पोलिसांनी हाच धागा पकडून गार्डन परिसरात शोध घेतला असता तेथील पाण्याच्या टाकीत अंकुश आणि अर्जुन यांचे मृतदेह सोमवारी आढळून आले.
प्रकरणाची चौकशी करू...
महर्षी कर्वे उद्यानात घडलेल्या या घटनेने मुंबई महापालिकेचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे. यासंदर्भात महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आम्ही लवकरच या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त किशोर गांधी यांनी दिली.
पाण्याच्या टाकीवर प्लास्टिक आवरण...
वन गार्डनमध्ये खूप जुनी जमिनीत पाण्याची मोठी टाकी असून, त्या टाकीचे झाकण उघडे होते, त्याच्यावर काळ्या रंगाचे प्लास्टिक टाकण्यात आले होते. पाण्याच्या टाकीवर झाकण नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
संशयास्पद मृत्यू...
पोलिसांनी दाखवलेल्या सीसीटीव्हीत शेजारच्या मुलांच्या मागे मुले गार्डनमध्ये जाताना दिसत आहेत. त्यानंतर ती परतली नाहीत. माझ्या मुलांसोबत नेमके काय झाले, याबाबत पोलिसांनी सखोल तपास करावा.
- मनोज वाघरी, मृत मुलांचे वडील
पाण्याची बाटली भरण्याचे निमित्त
गार्डनबाहेरील सीसीटीव्हीत एका मुलाच्या मागे जाताना दिसत असले तरी तो मुलगा आधीच बाहेर पडलेला दिसतो. तसेच एका सोसायटीच्या सीसीटीव्हीत ही मुले पाण्याच्या टाकीकडे खेळताना दिसत आहेत. खेळत असताना एकजण पाण्याच्या टाकीतून बाटलीत पाणी भरण्याचा प्रयत्न करत असताना टाकीत पडला. त्याच्या पाठोपाठ दुसराही घसरल्याचे दिसत आहे. प्राथमिक तपासात काहीही संशयास्पद आढळलेले नाही. यात आणखी कुणाचा निष्काळजीपणा आहे का, याची चौकशी करत आहोत.
- महादेव निंबाळकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आरएके मार्ग पोलिस ठाणे.