एकतर्फी वाटणारी निवडणूक आता होणार रंगतदार; भाजपने मविआला अंधारात ठेवत अचानक तगडा उमेदवार दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 09:29 AM2024-05-10T09:29:07+5:302024-05-10T09:57:24+5:30

भाजपने उमेदवारी ताटकळत ठेवत नंतर ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आणि वर्षा गायकवाड या एकतर्फी निवडून येणार, असा कयास राजकीय जाणकारांनी बांधला होता.

The seemingly one-sided election will now be colorful, ujjwal nikam vs Varsha Gaikwad | एकतर्फी वाटणारी निवडणूक आता होणार रंगतदार; भाजपने मविआला अंधारात ठेवत अचानक तगडा उमेदवार दिला

एकतर्फी वाटणारी निवडणूक आता होणार रंगतदार; भाजपने मविआला अंधारात ठेवत अचानक तगडा उमेदवार दिला

- सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने प्रा. वर्षा गायकवाड, तर महायुतीने ॲड. उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघ पालथा घालण्यास सुरुवात केली आहे. दोघानींही उच्चभ्रू सोसायट्यांपासून झोपड्या आणि चाळींमधील मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. अगदी सुरुवातीला एकतर्फी वाटणारा हा सामना उत्तरोत्तर रंगत असून, गायकवाड आणि निकम यांच्यात ‘टफ फाइट’ होईल, असे चित्र आहे. 

भाजपने उमेदवारी ताटकळत ठेवत नंतर ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आणि वर्षा गायकवाड या एकतर्फी निवडून येणार, असा कयास राजकीय जाणकारांनी बांधला होता. आता निकम यांनी प्रचारात चांगला लीड घेतला आहे. राजकीय अनुभव असलेल्या वर्षा गायकवाड या अल्पसंख्याक समाजाच्या भेटीगाठी घेण्यापासून झोपड्या आणि चाळींमध्ये अधिक फिरत आहेत. माजी मंत्री एकनाथ गायकवाड यांच्या कन्या म्हणून त्यांना मिळत असलेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे. 

कुठे कोणाचा प्रभाव? 
कुर्ला, जरीमरी, चांदिवली, वांद्रे, खार, कालिना या परिसरात अल्पसंख्याकांचे प्राबल्य आहे. विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम हे सहा विधानसभा मतदारसंघ असून, विलेपार्ले आणि वांद्रे पश्चिम या मतदारसंघावर भाजपची पकड आहे. तर चांदिवली, कलिना येथे काँग्रेसचा वरचष्मा आहे. कुर्ला आणि वांद्रे पूर्व येथे दोन्ही शिवसेनेचा मतदार अधिक आहे. 

वर्षा गायकवाड I महाविकास आघाडी 
वर्षा एकनाथ गायकवाड या माजी प्राध्यापिका  आहेत. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या शालेय शिक्षणमंत्री होत्या. काँग्रेसच्या तिकिटावर धारावीतून २००४ पासून त्या चार वेळा निवडून आल्या आहेत. प्राध्यापक म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केले आहे. काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या असून त्यांना वडिलांच्या राजकारणाचा वारसा आहे. २०१० ते २०१४ या काळात त्या महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री होत्या.

उज्ज्वल निकम I महायुती  
ॲड. उज्ज्वल निकम हे जळगावचे असून, त्यांचा जन्म उच्चशिक्षित आणि वकिलीचा वारसा असलेल्या कुटुंबात जन्म झाला आहे. विज्ञानाची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी जळगाव येथेच कायद्याची पदवी घेतली. बॉम्बस्फोट व दहशतवादी हल्ल्यांच्या अनेक महत्त्वाच्या खटल्यांत त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून युक्तिवाद केला आहे. २६/११ चा दहशतवादी हल्ला आणि अतिरेकी अजमल कसाबविरुद्धच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिले. उज्ज्वल निकम यांना प्रमोद महाजन स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

मतदारसंघाचा इतिहास : काँग्रेसची पकड असलेल्या मतदारसंघात मागील दोन वेळेस भाजपच्या पूनम महाजन खासदार होत्या. तत्पूर्वी २००९ मध्ये काँग्रेसच्या प्रिया दत्त तर २००४ मध्ये काँग्रेसचे एकनाथ गायकवाड येथे खासदार होते. 

Web Title: The seemingly one-sided election will now be colorful, ujjwal nikam vs Varsha Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.