रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवा, फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 05:40 AM2020-10-03T05:40:49+5:302020-10-03T05:40:59+5:30

फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी

Stop the black market of Remdesivir, Fadnavis's letter to the Chief Minister | रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवा, फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवा, फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Next

मुंबई : राज्यात रेमडेसिवीरची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून, परिणामी त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे गरीब रुग्णांचे अतोनात हाल होत असून, त्यांचे मृत्यू होत आहेत. यात तातडीने हस्तक्षेप करून गरीब रुग्णांना खासगी आणि सरकारी रुग्णालयात हे औषध मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली.

राज्यात दर दिवशी सरासरी सुमारे २० हजार कोरोना रुग्णांची भर पडत आहे. सरासरी ४५० ने दररोज बळीसंख्या वाढते आहे. अशा वेळी रेमडेसिवीर हे उपचारातील एक महत्त्वाचे औषध आहे. त्यामुळे त्याचा पुरवठा सुरळीत राहील, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे, परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची उपलब्धता नसल्याने गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. राज्य सरकार उपलब्धतेचे कितीही दावे करीत असले, तरी रुग्णालयांकडून मात्र टंचाईचेच कारण रुग्णांना सांगितले जात आहे. त्यामुळे रुग्णालयांकडून रुग्णांना थेट केमिस्टकडे ते खरेदी करण्यासाठी जाण्यास सांगितले जात आहे. याची किंमत लक्षात घेता, ते सामान्यांच्या आवाक्यात नाही. परिणामी, त्यांचे मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे.

कोरोनाच्या रुग्णांचे हाल
रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी राज्य सरकारने मध्यंतरी प्रक्रिया राबविली, परंतु ती प्रक्रिया सदोष असल्याने अनेक जिल्ह्यांतून खरेदी केलेला औषधसाठा परत करावा लागला, असे वृत्त माध्यमांमध्ये आले आहे. रेमडेसिवीर अभावी कोरोनाच्या रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. खरेदी योग्य झाली नसल्याने याच्या उपलब्धतेचा गुंता आणखी वाढला. परिणामी, प्रचंड तुटवडा निर्माण झाला. यामुळे रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून, त्यामुळे गरिबांचे सर्वाधिक हाल होत आहेत, याकडे फडणवीस यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले.

Web Title: Stop the black market of Remdesivir, Fadnavis's letter to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.