मंडप डेकोरेशनचे पैसे पाठवतो म्हणत एक लाखाचा गंडा! सैन्य दलात कार्यरत असल्याचा बनाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 10:14 AM2024-03-05T10:14:34+5:302024-03-05T10:17:04+5:30
याप्रकरणी तपास सुरू आहे.
मुंबई : मंडप डेकोरेशनचे पैसे पाठविण्याच्या बहाण्याने एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार मालाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. भामट्याने तो सैन्य दलात कार्यरत असल्याचा बनाव करत हा प्रकार केला आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे.
तक्रारदार कमल मिस्त्री (३३) यांना ३ मार्चला मनोज पटेल (३०) या मित्राने फोन करून सैन्य दलातील एका व्यक्तीकडून मंडप डेकोरेशनची ऑर्डर मिळाली आहे. त्याचे भाडे तो तुझ्या बँक खात्यात पाठवणार आहे, असे सांगितले. त्यावर मिस्त्री यांनी पटेल याला तो माझ्या खात्यात का पैसे पाठवतोय अशी विचारणा केली. त्यावर पैसे पाठवण्यासाठी माझ्या बँक खात्यात किमान २० हजार रुपये असणे आवश्यक आहे. मात्र, माझ्या खात्यात तितके पैसे नसल्याने मी तुझा नंबर दिला आहे, असे पटेल याने त्यांना सांगितले.
तीन व्यवहारांमध्ये पैसे वळते :
१) सैन्य दलातील व्यक्तीने मिस्त्रींना फोन करून माझ्या मित्राने मंडप डेकोरेशनच्या भाड्याची रक्कम तुम्हाला पाठवायला सांगितली आहे, असे म्हणाला. मिस्त्री यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत त्याने सांगितल्याप्रमाणे प्रोसेसची माहिती घेण्यासाठी त्यांच्या पत्नीचा फोन नंबर त्याला दिला.
२) फोन करणाऱ्याने मिस्त्री यांच्या पत्नीच्या व्हॉट्सॲपवर क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करून कोड क्रमांक म्हणून ५०० रुपये पाठवायला सांगितले. त्यानुसार मिस्त्री यांनी पैसे पाठवले. लगेचच फोन करणाऱ्याने त्यांच्या खात्यात हजार रुपये पाठवले. मिस्त्री यांचा त्याच्यावर विश्वास बसला.
३) त्यानंतर त्याच्या सूचनेप्रमाणे मिस्त्री यांनी पुन्हा प्रोसेस पूर्ण करून तीनदा त्यांनी कोड टाइप केले. मिस्त्री यांच्या खात्यातून तीन व्यवहारांमधून एकूण ९४ हजार ९८३ रुपये वळते झाले.