पारसिक बोगद्याजवळ रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 09:37 AM2019-10-26T09:37:03+5:302019-10-26T10:42:18+5:30
मुंबईची लाइफलाइन असलेली मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाली.
मुंबईः मुंबईची लाइफलाइन असलेली मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाली. पारसिक बोगद्याजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे जलद मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे, ठाण्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीचाही खोळंबा झालाय. पारसिक बोगद्याजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे मुंबईकडे येणारी धीम्या मार्गावरील वाहतूक रडतखडत सुरू आहे. तर दिवाळीमुळे उद्या मेगाब्लॉक नसल्याचंही रेल्वे प्रशासनानं जाहीर केलं आहे. नातेवाईकांसह मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्या अनेक जण घराबाहेर पडणार आहेत. त्यांना मेगाब्लॉग रद्द करून रेल्वे प्रशासनानं दिलासा देण्याचा प्रय्तन केला आहे.
दर रविवारी असणारा दिवसकालीन ब्लॉक मुंबई रेल्वेने रद्द केला. त्यामुळे उद्या दिवसभर रेल्वेनं प्रवास करताना चाकरमान्यांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागणार नाही. दरम्यान, आज, शनिवारी मध्यरात्रीनंतर अंधेरी-बोरिवली स्थानकात रात्रकालीन ब्लॉक पश्चिम रेल्वेकडून घोषित करण्यात आला आहे.
अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन ब्लॉक आहे. शनिवार रात्री 12 ते रविवार पहाटे 4 या वेळेत ब्लॉक काळातील कामे करण्यात येतील. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. यामुळे पश्चिम रेल्वेवर रविवार दिवसकालीन ब्लॉक रद्द करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.