ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 05:24 AM2024-05-17T05:24:16+5:302024-05-17T05:26:03+5:30

दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या नातेवाइकांना लवकरच आर्थिक मदत दिली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले. 

no one was left under the rubble the work stopped municipal commissioner information after ghatkopar hoarding collapse | ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : तुफानी वादळात पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय जाहिरात फलकाचा राडारोडा हटविण्याचे काम प्रगतिपथावर असून, ६० तासांनंतर बचावकार्य पूर्ण झाले आहे. महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी ही माहिती दिली. आयुक्तांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या नातेवाइकांना लवकरच आर्थिक मदत दिली जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले. 

घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्घटना स्थळी बचाव कार्यासाठी पालिका, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलिस, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, महानगर गॅस लिमिटेड यांच्यासह विविध शासकीय व बाह्य यंत्रणांचा समावेश होता. सर्व यंत्रणांनी आपसांत योग्य समन्वय राखून बचाव कार्य पूर्ण केले. घटनास्थळी अन्य कोणतीही व्यक्ती अडकली नसल्याची तपासणी करण्यात आली असून, या पाहणीअंती बचाव कार्य पूर्ण झाले. जाहिरात फलक कापून केलेले सुटे भाग, तसेच इतर राडारोडा, आदी हटविण्याचे काम सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.   

मुंबईतील होर्डिंग संदर्भात कोणत्या स्वरूपाची कार्यवाही करायची, यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. होर्डिंग कोणत्याही जागी असोत किंवा कोणाच्याही मालकीची असोत, जी आवश्यक मानके (स्टॅण्डर्डस) महानगरपालिकेने ठरवून दिली आहेत, त्यानुसार तसेच पालिकेची परवानगी घेतलेल्या फलकांसाठी संरचनात्मक स्थिरता परवानगी घेणे गरजेचे आहे. मुंबईत पालिकेचे परवानाधारक होर्डिंग आहेत त्यामुळे खबरदारी म्हणून त्या सर्वांची पुन्हा एकदा विभाग स्तरावर पडताळणी सुरू करण्यात आल्याची माहिती गगराणी यांनी दिली.

होर्डिंग मानकांचे पालन बंधनकारक 

पालिकेने रेल्वे प्रशासनालाही त्यांच्या हद्दीतील जाहिरात फलकांच्या संरचनात्मक स्थिरता पडताळणीसाठी सूचना केल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडूनही होर्डिंगच्या आवश्यक त्या सर्व मानकांचे पालन होणे गरजेचे आहे. या मानकांचे पालन न करणारे कोणतेही जाहिरात फलक असतील तरी ते हटविले पाहिजेत असे आयुक्तांनी स्पष्ट केले. रेल्वे प्रशासनच नव्हे, तर अन्य प्राधिकरणांनी ही संरचनात्मक स्थिरता तपासणी व पडताळणी करून पालिकेला प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, असे गगराणी यांनी नमूद केले. 

पेट्रोल पंपाच्या परवानगीचीदेखील तपासणी होणार 

मुंबईत कोणत्याही व्यवसायासाठी पालिकेचा विहित परवाना आवश्यक आहे. त्यानुसार घटनास्थळावर असलेल्या पेट्रोलपंपच्या बांधकामासाठी देखील प्रोव्हिजिनल (तत्त्वतः) परवाना देण्यात आला होता. पेट्रोलपंप चालविण्याचा विहित परवाना संबंधितांनी प्राप्त केलेला होता की नाही, आदी बाबतची महापालिका प्रशासनाकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार परवाना नसल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त गगराणी यांनी सांगितले.

Web Title: no one was left under the rubble the work stopped municipal commissioner information after ghatkopar hoarding collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.