मुंबईच्या पर्यटनाला बूस्टर; २० ते २८ जानेवारीदरम्यान होणार मुंबई फेस्टिव्हल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 11:12 AM2023-11-24T11:12:26+5:302023-11-25T08:58:21+5:30

२० ते २८ जानेवारीदरम्यान होणार मुंबई फेस्टिव्हल, लोगोचे अनावरण

Mumbai tourism booster; Mumbai Festival will be held from 20th to 28th January | मुंबईच्या पर्यटनाला बूस्टर; २० ते २८ जानेवारीदरम्यान होणार मुंबई फेस्टिव्हल

मुंबईच्या पर्यटनाला बूस्टर; २० ते २८ जानेवारीदरम्यान होणार मुंबई फेस्टिव्हल

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतीलपर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी २० ते २८ जानेवारीदरम्यान मुंबई फेस्टिव्हल २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारतर्फे या महोत्सवासाठी २५ कोटींचा निधी देण्यात येईल. स्वप्ननगरीच्या प्रवेशद्वारात अर्थातच मुंबईत होणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथील कार्यक्रमात मुंबई फेस्टिव्हल २०२४ कार्यक्रमाची घोषणा मंत्री महाजन यांनी केली. मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्र, पर्यटन संचालक डॉ. बी.एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी - शर्मा, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, काळा घोडा महोत्सवाच्या आयोजक ब्रिंदा मिलेरा, प्रख्यात संगीतकार शमीर टंडन आदी यावेळी उपस्थित होते. महाजन म्हणाले की, नऊ दिवसांच्या महोत्सवामध्ये सर्वांना एकत्र आणण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव, संगीत, नृत्य आणि सिनेमा इव्हेंट्स, फूड फेस्टिव्हल सादर केले जातील. हा उत्सव मुंबईकरांच्या भावना आणि शहराच्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसावर प्रकाश टाकणारे अनुभव आणि उपक्रम एकत्र आणणारा आहे.  पऱ्यटन उद्योगात नवीन संधी व मार्ग शोधणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. 

 ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ हा एक परिवर्तनकारी अनुभव आहे, जो भारताने पाहिलेल्या सर्वात मोठ्या वार्षिक उत्सवांपैकी एक आहे. म्युझिक फेस्ट, अर्थ मुव्ही कॉन्टेस्ट, बीच फेस्ट, मुंबई वॉक, टुरिझम कॉन्क्लेव्ह, सिनेमा फेस्ट, क्रिकेट क्लिनिक, महाशॉपिंग फेस्ट, महामुंबई एक्स्पो या उपक्रमांचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश आहे, असे गिरीश महाजन म्हणाले. 

जबाबदारी वादग्रस्त विझक्राफ्ट कंपनीला

 राज्य सरकारच्या पर्यटन विभागातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ च्या संकल्पना आणि व्यवस्थापनाची जबाबदारी वादग्रस्त ठरलेल्या विझक्राफ्ट कंपनीला देण्यात आली आहे. २०१६ साली याच कंपनीवर राज्य सरकारच्या एका कार्यक्रमातील हलगर्जीपणाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 मुंबईत २०१६ साली मेक इन इंडियाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून गिरगाव चौपाटी येथे महाराष्ट्र नाईट या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी विझक्राफ्ट कंपनीकडे होती. मात्र, या कार्यक्रमाच्या आयोजनात केलेल्या हलगर्जीपणामुळे  कार्यक्रमाच्या ठिकाणी आगीची मोठी दुर्घटना घडली होती. २०१६ मध्ये कंपनीला काळ्या यादीत टाकले होते.

Web Title: Mumbai tourism booster; Mumbai Festival will be held from 20th to 28th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.