अधिकाधिक युवांनी आर्बिटर बनण्यासाठी भर द्यावा - प्रीती देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 03:45 AM2019-10-04T03:45:06+5:302019-10-04T03:45:16+5:30
‘बुद्धिबळ खेळामध्ये एक खेळाडू म्हणून चांगली कारकिर्द घडविता येऊ शकते. मात्र आज आर्बिटरची या खेळामध्ये मोठी मागणी असून आर्बिटर बनण्यासाठी बुद्धिबळाचे सामान्य ज्ञानही पुरेसे ठरते.
- रोहित नाईक
मुंबई : ‘बुद्धिबळ खेळामध्ये एक खेळाडू म्हणून चांगली कारकिर्द घडविता येऊ शकते. मात्र आज आर्बिटरची या खेळामध्ये मोठी मागणी असून आर्बिटर बनण्यासाठी बुद्धिबळाचे सामान्य ज्ञानही पुरेसे ठरते. त्यामुळेच अधिकाधिक युवांनी आर्बिटर बनण्यावर भर द्यावा,’ असे मत मुंबईतील पहिल्या महिला आर्बिटर प्रीती देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
पवई येथे सुरू असलेल्या जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत प्रीती आर्बिटरच्या भूमिकेत असून त्या मुंबईतील पहिल्या, तर महाराष्ट्रातील केवळ दुसऱ्या महिला आर्बिटर आहेत. पुण्याच्या विनिता श्रोती यांच्यानंतर प्रीती या महाराष्ट्रातील दुसºया, तर भारतातील केवळ पाचव्या महिला आर्बिटर आहेत.
बोरीवली येथील वझीरा नाका परिसरात राहणाºया प्रीती म्हणतात की, ‘बुद्धिबळ पटावर लक्ष ठेवणे, तांत्रिक बाबींसह, खेळाडूंच्या अडचणी सोडविणे अशी जबाबदारी आर्बिटरवर असते. सोप्या भाषेत आर्बिटर हा बुद्धिबळतील पंच असतो. आज भारतात मोठ्या प्रमाणात बुद्धिबळ खेळला जात असून पुरेसे आर्बिटर उपलब्ध नाहीत. त्यामुळे आर्बिटरची मोठी मागणी आहे. कधीकधी एका आर्बिटरला एकाचवेळी सुमारे ५० बोर्डवर लक्ष द्यावे लागते.’
प्रीती यांनी पुढे सांगितले की, ‘आर्बिटर बनण्यासाठी सर्वप्रथम बुद्धिबळाची आवड असणे आवश्यक आहे. सामान्य ज्ञान असले, तरी तुम्ही आर्बिटर बनू शकता. आर्बिटर म्हणून खेळाडूची मानसिकता ओळखता आली पाहिजे. जिल्हा स्तरापासून आर्बिटरची परीक्षा होते. यातून राज्यस्तरीय आर्बिटर होऊन काही स्पर्धांचा अनुभव घेतला की, वरिष्ठ राष्ट्रीय स्तराची संधी मिळते. यानंतर आंतरराष्ट्रीय रेटिंग स्पर्धांमध्ये आर्बिटर म्हणून काम करण्याचा अनुभव मिळतो. शेवटी आंतरराष्ट्रीय आर्बिटर असतो ज्यात जीएम स्पर्धा पार पाडाव्या लागतात.’
स्वत: प्रीती आंतरराष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी मुंबई विद्यापीठ स्पर्धांमध्ये सुवर्णपदकही जिंकले आहे. मुळात लहानपणापासून या खेळाची आवड असल्याने दिवसभर स्पर्धेत लक्ष दिल्यानंतरही त्यांच्या चेहºयावर कोणताही ताण दिसून येत नाही. आई-वडिलांच्या इच्छेमुळे खेळाकडे वळलेल्या प्रीती यांचे भाऊ अमेय करंदीकर व पती प्रसाद देशमुख हेही आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू आहे.
प्रीती यांनी क्रीडा कारकिर्दीविषयी युवांना संदेश दिला आहे की, ‘खेळातील कारकिर्द म्हणजे केवळ खेळाडू नाही. आज अनेक खेळांमध्ये प्रशिक्षक, स्कोरर, पंच यामध्येही मोठी संधी आहे. त्यादृष्टीने युवांनी तयारी करावी. विशेष करुन बुद्धिबळात आर्बिटर म्हणून मोठी संधी असून आज निर्माण झालेली ही पोकळी भरुन काढता येईल.’
नुकताच १६ सप्टेंबरला बुद्धिबळाची जागतिक संघटना असलेल्या ‘फिडे’ने प्रीती यांना आंतरराष्ट्रीय आर्बिटरचा बहुमान दिला. याबाबत त्यांनी सांगितले की, ‘मुंबईची पहिली आर्बिटर बनणे खूप चांगला अनुभव आहे. जेव्हा मला याविषयी कळाले तेव्हा विश्वास बसला नाही. आता मी मुंबईतील जागतिक युवा स्पर्धेचा आनंद घेत आहे. ही स्पर्धा पहिल्यांदाच भारतात होत असल्याने मोठी संधी आहे. विदेशी खेळाडूंसाठी आर्बिटर म्हणून जबाबदारी पार पाडणे वेगळाच अनुभव आहे. काहीसे दडपणही आहेच, पण ही स्पर्धा मुंबईत होत असल्याने मी निश्चिंतही आहे.’