मोहित कंबोजच्या अडचणीत वाढ, खटला बंद करण्याचा अहवाल फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 07:42 AM2023-11-05T07:42:03+5:302023-11-05T07:42:10+5:30

दंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे कंबोज यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Mohit Kamboj troubles increase, reports of case closure dismissed | मोहित कंबोजच्या अडचणीत वाढ, खटला बंद करण्याचा अहवाल फेटाळला

मोहित कंबोजच्या अडचणीत वाढ, खटला बंद करण्याचा अहवाल फेटाळला

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांना मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. सेंट्रल बँक ऑफ इंडियातील १०३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने खटला बंद करण्यासाठी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट दंडाधिकारी जयवंत यादव यांनी फेटाळून लावला. इतकेच नव्हे तर याप्रकरणी पुढील तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. दंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे कंबोज यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
टेनेट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक मोहित कंबोज व इतर काही जणांनी क्रेडिट सुविधेचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून सेंट्रल बँक ऑफ इंडियाची १०३ कोटी रुपयांची फसवणूक केली, असा  कंबोज यांच्यावर आरोप आहे. दंडाधिकारी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला, दंडाधिकाऱ्यांनी अहवाल फेटाळून लावला.

दंडाधिकारी यांचे निरीक्षण
-   आरोपींनी कर्जासाठी खरेदी-विक्रीची बनावट कागदपत्रे बँकेत सादर केली. भारतीय दंडसंहितेच्या कलम १२० (ब), ४१७, ४२०, ४६७, ४६८ आणि ४७१ नुसार हा शिक्षापात्र गुन्हा असून, यंत्रणांनी केलेला तपास अपूर्ण आहे.
-    प्रथमदर्शनी यात असे दिसून येते की, आरोपींनी बँकेकडून कर्ज मिळविण्यासाठी कागदपत्रांची चुकीची माहिती दिली.
-    बनावट कागदपत्रे बनवून आणि राष्ट्रीयीकृत बँकेची (सेंट्रल बँक ऑफ इंडिया) कोट्यवधींची फसवणूक करून सार्वजनिक पैशाचा गैरवापर केल्यामुळे आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यावर कारवाई करणे आवश्यक आहे.

Web Title: Mohit Kamboj troubles increase, reports of case closure dismissed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.