विलेपार्ल्यात मराठी-गुजराती वाद; मराठी माणसांना घर नाकारल्याने उद्धवसेनेचे बिल्डरविरोधात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 09:25 AM2024-05-10T09:25:43+5:302024-05-10T09:25:54+5:30
विलेपार्ल्यातील बिल्डरने मराठी माणसांना घर नाकारल्याच्या तक्रारीवरून उद्धवसेनेने संबंधित बिल्डरविरोधात आंदोलन छेडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घाटकोपर येथील गुजरातीबहुल सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारल्याचा प्रकार ताजा असतानाच आता मराठीबहुल पार्ल्यात मराठी विरुद्ध गुजराती, असा वाद पेटला आहे. विलेपार्ल्यातील बिल्डरने मराठी माणसांना घर नाकारल्याच्या तक्रारीवरून उद्धवसेनेने संबंधित बिल्डरविरोधात आंदोलन छेडले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विलेपार्ल्यातील काही बिल्डर घराची चौकशी करण्यासाठी येणाऱ्या मराठी ग्राहकांना ते शाकाहारी वा मांसाहारी आहेत का, असा प्रतिप्रश्न करतात. मराठी ग्राहक मांसाहारी असल्यास घराची किंमत वाढवून सांगितली जाते. तसेच काही बिल्डर मांसाहार करणाऱ्या मराठी ग्राहकांना घरच नाकारत असल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. उद्धवसेनेच्या महिला समन्वयक जुईली शेंडे यांना हा अनुभव आल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली.
त्यानंतर आमदार ॲड. अनिल परब यांच्या सूचनेनुसार विलेपार्ले संघटक संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली ऑर्किड बिल्डरचे अमित जैन यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून त्यांना निवेदन देण्यात आले. बिल्डर जैन यांनी मराठी ग्राहकांशी भेदभाव करणार नाही, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.