मॉल सजले, सेल लागले; चौपाट्यांवर गर्दी ; नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर पर्यटनस्थळी, हॉटेल आणि पबमध्ये 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 01:51 PM2023-12-31T13:51:34+5:302023-12-31T13:52:01+5:30

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी जोरदार तयारी केली असून, अनेकांनी शहराजवळच्या पर्यटन स्थळांकडे कूच केली आहे, तर अनेकांनी आपल्या गँगसोबत हाॅटेल्स, पब्समध्ये सेलिब्रेशनचा बेत केला आहे.

Mall decorated, sales opened Mumbaikars welcome the New Year at tourist spots, hotels and pubs | मॉल सजले, सेल लागले; चौपाट्यांवर गर्दी ; नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर पर्यटनस्थळी, हॉटेल आणि पबमध्ये 

मॉल सजले, सेल लागले; चौपाट्यांवर गर्दी ; नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर पर्यटनस्थळी, हॉटेल आणि पबमध्ये 

मुंबई : मुंबई यंदा ‘नवीन वर्ष आणि विकेण्ड’ असा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने मागील आठवड्यापासून याच गोष्टीची चर्चा आहे. काय मग प्लॅन झाला का? यंदा कुठे सेलिब्रेशन? या आणि अशा अनेक प्रश्नांवर अखेर मुंबईकरांनी उत्तरे दिली. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी जोरदार तयारी केली असून, अनेकांनी शहराजवळच्या पर्यटन स्थळांकडे कूच केली आहे, तर अनेकांनी आपल्या गँगसोबत हाॅटेल्स, पब्समध्ये सेलिब्रेशनचा बेत केला आहे. 

थर्टी फर्स्टच्या निमित्ताने सुटी न मिळालेल्या मुंबईकरांनी सायंकाळनंतर गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, नरिमन पाॅइंट, जुहू, बँड स्टँड अशा वेगवेगळ्या ठिकाणी भेट देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा प्लॅन केला आहे. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, लाऊडस्पीकरवरील गाण्यांचा माहोल, उधाणलेला समुद्र आणि एकत्र जमलेले मुंबईकर ही सेलिब्रेशनची आगळीवेगळी रीत चांगलीच रुजली आहे.

नववर्ष स्वागतासाठी अनेकांनी मुंबईच्या बाहेर जाण्याचे बेत आखले आहेत. शेवटच्या क्षणी बुकिंगसाठी धडपडणाऱ्या मंडळींच्या पदरी निराशा पडत आहे. शहर उपनगरातील माॅल्समध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतींची खैरात केली आहे. आणि बच्चे कंपनीचे मन जिंकण्यासाठी आकर्षक रोषणाईही केलेली दिसून येत आहे. 
यंदाच्या थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनमध्ये अगदी मोठ्या पार्ट्यांपासून ते अगदी हाऊस पार्ट्यांमध्ये ‘डाॅल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजेला’ आणि ‘जमाल कुडू’ या गाण्यांवर तरुणाईसह सर्वच मंडळी थिरकताना दिसून येणार आहे.

हॉटेल, पब्सही सज्ज !
न्यू इयरसाठी तरुणाईचा वाढता ओढा पाहता, हाॅटेल्स, क्लब्स, पब्सही सेवेत सज्ज झालेत. 
मात्र, या ठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी युगुलांना सुमारे २००० रुपये मोजावे लागणार आहेत. तर एकट्याच्या प्रवेशासाठी १५०० रुपये मोजावे लागणार आहेत. 

थर्टी फर्स्टला रविवार असूनही सुटी न मिळालेल्यांना मुंबईच्या बाहेर जाणे सर्वांनाच शक्य नसल्याने मुंबईतच थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा निर्णय मुंबईकरांनी घेतला आहे. ही मेख ओळखून पब्स आणि हॉटेल्सही सज्ज झाले आहेत.

भूर्रर्रsss चले हम! 
नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातील जवळपास सर्वच रिसॉर्ट फुल्ल आहेत. याशिवाय महाबळेश्वर, माळशेज, शिर्डी, भंडारद्वार येथील रिसॉर्टचीही परिस्थिती काही वेगळी नाही. मुरूड, अलिबाग, हर्णे, दापोली, दिवेआगार, माथेरान, लोणावळा, पाचगणी, आदीकडे मुंबईकरांचा ओढा आहे. 

तीर्थक्षेत्रेही फुलली 
-  सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाच्या स्वागताला देवदर्शन घेण्यासाठी बरेचजण घराबाहेर पडले आहेत. 
-  शिर्डी, सप्तशृंगी, अष्टविनायक अशा ठिकाणी गर्दी वाढते आहे. नवीन वर्ष आनंददायी जावे यासाठी परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अनेकजण जातात. 
-  मुंबईकरही सिद्धिविनायक, महालक्ष्मी, हाजीअली, कुलाबा-माहीम चर्च या प्रार्थना स्थळांना भेटी देतात.

नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळी जाण्यासाठी मुंबईकरांनी छत्रपती शिवाजी टर्मिनन्स येथे गर्दी केली होती. तर दुसरीकडे कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलिसांनी श्वानपथकासह कसून तपासणी केली. 
      (छाया : दत्ता खेडेकर,    सुशील कदम
 

Web Title: Mall decorated, sales opened Mumbaikars welcome the New Year at tourist spots, hotels and pubs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.