Maharashtra Government: 'शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे गाजर देऊन तिघाडी सरकार जनतेच्या बोकांडी बसवले'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 09:53 AM2019-12-04T09:53:31+5:302019-12-04T09:53:59+5:30

105 जागा मिळवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना जनतेने नाकारलं असं शरद पवार सांगतात

Maharashtra Government: BJP Mla Atul Bhatkhalkar targets NCP leader Sharad Pawar | Maharashtra Government: 'शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे गाजर देऊन तिघाडी सरकार जनतेच्या बोकांडी बसवले'

Maharashtra Government: 'शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचे गाजर देऊन तिघाडी सरकार जनतेच्या बोकांडी बसवले'

Next

मुंबई - राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर विरोधी पक्ष भाजपाने महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक टीका सुरु केली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांच्या विधानावरुन त्यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांना अहम् नडला असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं होतं. पण वस्तूस्थिती ही की शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचे गाजर दाखवून पवारांनी त्यांना काँग्रेससोबत जोडले. तिघाडी सरकार जनतेच्या बोकांडी बसवले आणि महायुतीला मिळालेल्या जनादेशाचा अपमान केला असा आरोप भाजपाने शरद पवारांवर केला आहे. 

तसेच अतुल भातखळकर म्हणतात की, 105 जागा मिळवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना जनतेने नाकारलं असं शरद पवार सांगतात, म्हणजे ५०-५५ जागा मिळवणाऱ्या तुमच्या पक्षाला लाथाडलं असंच म्हणावं लागेल असा टोला त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. तसेच मेट्रोसारखे जनोपयोगी प्रकल्प बंद करून मत्सालयाचा घाट घालणे म्हणजे तिघाडी सरकारची निव्वळ बौद्धिक दिवाळखोरी आहे. वाहतूक कोंडीने हैराण झालेल्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळणे बंद करा अशा शब्दात भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. 

राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील प्रकल्पांकडे मोर्चा वळवला आहे. आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पुनर्विचार केला जाईल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

तसेच ‘मी पुन्हा येईन’, असे सगळेच म्हणत असतात, त्यात गैर काहीच नाही, मात्र हे म्हणत असताना देवेंद्र फडणवीस यांनी काही विधाने केली. निवडणुकीच्या काळातील त्यांच्या भाषणांमध्ये मी पणाचा दर्प होता, त्याची त्यांना किंमत मोजावी लागली, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन यावर शरद पवारांना विचारण्यात आले. त्यावर पवार म्हणाले, तुम्हाला लोकांचा पाठिंबा असेल तर त्या पाठिंब्याचा उपयोग आपल्या संघटन वाढीसाठी करून घ्यावा. मात्र त्यात मी पणाचा दर्प असू नये. शेवटच्या प्रचारसभांमधील फडणवीसांच्या भाषणांमधून सत्तेचा दर्प येत होता, असं पवार यांनी सांगितलं होतं. त्यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.  
 

Web Title: Maharashtra Government: BJP Mla Atul Bhatkhalkar targets NCP leader Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.