महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : ६ हजारांहून अधिक मतदारांचा ‘नोटा’धिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 02:41 AM2019-10-25T02:41:05+5:302019-10-25T06:09:15+5:30
Maharashtra Election 2019: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील वरळीचा मतदारसंघ चर्चेचा ठरला. ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी निवडणुकांच्या रिंगणात उतरल्याने या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते.
मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील वरळीचा मतदारसंघ चर्चेचा ठरला. ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी निवडणुकांच्या रिंगणात उतरल्याने या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. गुरुवारी निवडणूक निकालाच्या दिवशी शिवसेनेचे आदित्य ठाकरेवरळी मतदारसंघातून विजयी ठरले खरे, मात्र वरळीकरांनी या मतदानात हे तरुण नेतृत्व नाकारत चक्क ६ हजार ३०५ मतदारांनी ‘नोटा’धिकार बजावला आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात शिवसेनेचे आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे अॅड. सुरेश माने, वंचित बहुजन आघाडीचे गौतम गायकवाड आणि बिग बॉस फेम अपक्ष अभिजित बिचुकले यांच्यात लढत होती. मात्र गुरुवारी वरळीच्या मतदारांनी आदित्य ठाकरे यांच्या पारड्यात ८९ हजार मते टाकून त्यांना विजयी केले. मात्र वरळीकरांना पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील तरुण नेतृत्वाला स्वीकारण्याची संधी होती, मात्र याच मतदारांनी नोटाला मते दिली आहेत.
युवासेना प्रमुख असणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्याकडून नवमतदारांना अपेक्षा आहेत. तसेच, तरुण पिढीच्या समस्या व प्रश्नांसाठी आदित्य ठाकरे कायम आग्रही असल्याचे चित्र आहे. परंतु असे असूनही ६ हजारांहून अधिक मतदारांनी नोटाला मते दिली. याखेरीज, अपक्ष उमेदवार म्हणून अभिजित बिचुकले यांनाही वरळीकरांनी ७१० मते दिली आहेत. या नोटाच्या पर्यायाच्या निमित्ताने आता निवडणूक आणि मतदान प्रक्रियेत या पर्यायाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. मतदार अतिशय जागरूकपणे अपल्या मतदानाचा हक्क बजावत असल्याचे यातून दिसून येत आहे.