चित्रपटांना लागली मराठी साहित्याची गोडी

By संजय घावरे | Published: May 11, 2024 11:10 PM2024-05-11T23:10:08+5:302024-05-11T23:14:12+5:30

बाबासाहेब पुरंदरे, भालचंद्र नेमाडे, अण्णा भाऊ साठे, प्रकाश संत यांच्या साहित्यावर येणार सिनेमे.

Films got the taste of Marathi literature | चित्रपटांना लागली मराठी साहित्याची गोडी

चित्रपटांना लागली मराठी साहित्याची गोडी

मुंबई - मराठी साहित्याने नेहमीच चित्रपटांना भुरळ घातली आहे. याच कारणामुळे साहित्यावर आधारलेले बरेच चित्रपट आजवर रिलीज झाले आहेत आणि प्रेक्षकांनीही ते डोक्यावरही घेतले आहेत. लवकरच साहित्यावर आधारलेले आणखी काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 

'दुनियादारी', 'बनगरवाडी', 'नटरंग', '७२ मैल एक प्रवास', 'बोक्या सातबंडे', 'फास्टर फेणे', 'शाळा', 'श्वास', 'जोगवा', 'पांगिरा', 'श्री पार्टनर', 'युद्ध', 'निशाणी डावा अंगठा' आदी साहित्यावरील चित्रपटांनी रसिकांवर मोहिनी घातली आहे. अलीकडच्या काळात रिलीज झालेल्या 'श्यामची आई' आणि 'चंद्रमुखी' या चित्रपटांनीही लक्ष वेधले. आता 'कोसला', 'लंपन', 'फकिरा', 'फुलवंती' हे कादंबरीवरील चार मराठी चित्रपट रसिक दरबारी सादर होणार आहेत. 

अण्णा भाऊ साठे यांच्या 'फकिरा'वर चित्रपट बनवण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, पण पूर्णत्वास गेला नाही. १९५९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला १९६१मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणाऱ्या फकिराची शौर्यगाथा या कादंबरीत आहे. 'ख्वाडा'साठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेने हे शिवधनुष्य उचलले आहे. नाना पाटेकर, सयाजी शिंदे, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, मकरंद देशपांडे, मुक्ता बर्वे, नागेश भोसले, संदीप पाठक, कमलेश सावंत, किरण माने आदी कलाकार यात आहेत.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घोषणा करण्यात आलेल्या सात मराठी चित्रपटांपैकी 'फुलवंती' हा चित्रपट शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून आकाराला आलेल्या 'फुलवंती' या कादंबरीवर आधारलेला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी यानिमित्ताने चित्रपट पदार्पण करीत असून, तिच्यासोबत कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी हे निर्माते आहेत. लेखन-संवाद प्रविण तरडेचे असून दिग्दर्शन स्नेहल तरडे करीत आहे. यातील पखवाज आणि घुंगरांची जुगलबंदी रसिकांना खुणावणार आहे

'लंपन' हि वेब सिरीज प्रकाश नारायण संत यांच्‍या 'वनवास' या कादंबरीवर आधारलेली आहे. यातील निरागस व आत्‍म-शोधाच्‍या हृदयस्‍पर्शी कथेमध्‍ये मिहिर गोडबोलेने लंपनची भूमिका साकारली आहे. लंपनच्या आजीच्‍या भूमिकेत गीतांजली कुलकर्णी, तर आजोबांच्‍या भूमिकेत चंद्रकांत कुलकर्णी आहेत. याखेरीज अवनी भावे आणि पुष्‍कराज चिरपुटकर व कादंबरी कदमही यात आहेत. दिग्दर्शन निपुण धर्माधिकारीने केले असून, श्रीरंग गोडबोले, ऋषिकेश देशपांडे, अमित पटवर्धन यांनी निर्मिती केली आहे.

भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला' या अपार लोकप्रिय झालेल्या कादंबरीवर चित्रपट बनत आहे. सयाजी शिंदे यात पांडुरंग सांगवीकर साकारत आहे. १९६३ मध्ये वयाच्या २५व्या वर्षी नेमाडे यांनी लिहिलेली ही कादंबरी इंग्रजीसह हिंदी, गुजराती, कन्नड, असामी, पंजाबी, उर्दू, बंगाली आणि ओरियामध्ये अनुवादित झाली. त्यामुळे हि कादंबरी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली. यासाठी नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. आदित्य राठी आणि गायत्री पाटील दिग्दर्शन करणार असून, मेहुल शाह निर्माते आहेत. 

Web Title: Films got the taste of Marathi literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई