दिव्यांग मतदारांसाठी ‘बेस्ट’ उपक्रम, ५०० हून अधिक बसचे नियोजन; लवकरच अंतिम निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 10:32 AM2024-05-06T10:32:33+5:302024-05-06T10:34:52+5:30
निवडणुकीत मतदान केंद्रापर्यंत पोहोचताना दिव्यांग नागरिकांच्या वाट्याला येणारा मनस्ताप टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनानेही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मुंबई : निवडणुकीत मतदान केंद्रापर्यंत पोहोचताना दिव्यांग नागरिकांच्या वाट्याला येणारा मनस्ताप टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनानेही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांच्यासाठी मतदानादिनी बेस्ट उपक्रमाची एसी बससेवा दिली जाणार आहे.
निवडणूक आयोग, समाज कल्याण विभाग आणि बेस्ट उपक्रमाकडून ही सुविधा उपलब्ध केली जाणार असून, लवकरच याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. यासाठी मतदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी घरबसल्या मतदान करण्याची सुविधा दिली आहे. मात्र, ज्या मतदारांना मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याची इच्छा असेल, त्यांच्यासाठी ‘बेस्ट’ची एसी सेवा दिली जाणार आहे. मुंबई उपनगरांतील ज्येष्ठ नागरिकांनाही याचा लाभ घेता येणार आहे.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांत यासाठी २६ बसगाड्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. समाज कल्याण विभागाच्या मदतीने बेस्ट उपक्रम ही सुविधा देणार असून, याबाबत बैठकाही झाल्या आहेत. सध्या बेस्ट उपक्रमाकडे एकूण ३ हजारांपेक्षा जास्त बसगाड्या आहेत. त्यात ४०० एसी बस दिव्यांगस्नेही आहेत. यामध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प आहेत. त्यामुळे दिव्यांग उमेदवार व्हिलचेअरसह यामध्ये प्रवेश करू शकतात. मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे.
निवडणूक काळात निवडणूक कर्मचाऱ्यांची तसेच पोलिसांची वाहतूक करण्यासाठीही निवडणूक आयोगाने बेस्ट बसगाड्या उपलब्ध करण्यास सांगितले असून, त्यावर ही सध्या चर्चा सुरू आहे.
बसेस पोलिस, निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी-
१) ५००हून अधिक बस उपलब्ध करण्याचे नियोजन असून, यामध्ये ५० बस पोलिस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी असणार आहेत.
अशी असेल सुविधा -
मुंबईत दिव्यांग मतदारांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे एक दिवसआधी या बस संबंधित विभागात उभ्या केल्या जाणार आहेत.
कोणत्या भागांत किती ज्येष्ठ नागरिक आहे, याची माहिती ‘बेस्ट’ला दिली जाणार आहे. त्यानुसार त्या-त्या भागांत बेस्टची सुविधा सकाळपासून उपलब्ध असणार आहे.