प्रकल्पांची रखडपट्टी; जबाबदार कोण? गोखले पुलासोबत ‘कोस्टल’ची चौकशी होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 09:40 AM2024-04-19T09:40:11+5:302024-04-19T09:44:11+5:30

मुंबई महापालिकेने हाती घेतलेले विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प विविध कारणांमुळे रखडले असून, ते मार्गी लावताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे.

along with andheri gokhale bridge will there be an inquiry into road concreting and coastal by bmc | प्रकल्पांची रखडपट्टी; जबाबदार कोण? गोखले पुलासोबत ‘कोस्टल’ची चौकशी होणार का?

प्रकल्पांची रखडपट्टी; जबाबदार कोण? गोखले पुलासोबत ‘कोस्टल’ची चौकशी होणार का?

मुंबई : मुंबई महापालिकेने हाती घेतलेले विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प विविध कारणांमुळे रखडले असून, ते मार्गी लावताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे. तांत्रिक चुकांमुळे एकीकडे प्रकल्पांचा खर्च वाढत असतानाच दुसरीकडे नागरिकांच्या रोषालाही पालिकेला सामारे जावे लागत आहे. अंधेरीतील गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्या उंचीतील तफावतीची चौकशी करण्याचे संकेत मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. 

याच धर्तीवर रस्ते काँक्रिटीकरणाची रखडलेली कामे, दादर येथील टिळक पुलाचे बांधकाम, कोस्टल रोडच्या सबवेमध्ये साचलेले पाणी, याचाही आढावा घेऊन आयुक्त दोषींवर कारवाई करणार का, या विषयी मुंबईतील नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अंधेरीच्या गोखले पुलाची उंची काही मीटरने वाढली आहे. त्यामुळे हा पूल आणि बर्फीवाला पूल जोडला न गेल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. 

आयआयटीच्या तज्ज्ञांच्या सूचेनुसार काम-

गोखले पुलाचा घोळ संपुष्टात आणण्यासाठी आयआयटी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. त्यांनी सुचविलेल्या उपायांनुसार पुलाच्या उंचीतील तफावत दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

जूनच्या मध्यापर्यंत या पुलांच्या जोडणीचे काम पूर्ण होईल.गोखले पुलाचा दुसरा टप्पा डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. मात्र, तफावत दूर करण्यासाठी आता खर्चात आणखी भर पडणार आहे. गोखले पुलाचे संरेखन चुकले कसे, याची चौकशी केली जाणार आहे. 

१)  दादर येथील टिळक पुलाचाही असाच घोळ झाला आहे. या पुलाचे बांधकाम करताना पुलाचा एक गर्डर शेजारच्या निवासी इमारतीला खेटून उभारण्यात आला आहे. त्यामुळे या इमारतीच्या भविष्यातील पुनर्विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर कोस्टल रोडची एक मार्गिका काही दिवसांपूर्वीच सुरू झाली. मात्र, कोस्टल रोडच्या सबवेमध्ये काही दिवसांपूर्वी पाणी साचले होते. हा प्रकार नेमका कशामुळे झाला याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

 रस्त्यांच्या कामांना पावसाळ्यानंतर मुहूर्त-

१)  मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. मात्र अनेक ठिकाणी अजून कामेच सुरू झालेली नाहीत. आता तर या कामांना पावसाळ्यानंतर मुहूर्त मिळणार आहे. 

२)  शहरातील कामांचा तर खेळखंडोबा झाला आहे. कार्यादेश मिळूनही संबंधित कंत्राटदाराने वर्षभर काम सुरू न केल्यामुळे त्याचे कंत्राट रद्द करून दंड ठोठावण्याची वेळ पालिकेवर आली. 

३)  या भागातील कामांसाठी आता नव्याने निविदा काढली आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामांचे नेमके काय झाले, विलंब होण्यास कोण कारणीभूत आहेत, याची चौकशी आयुक्त करणार का, याकडे लक्ष लागले आहे.

स्वच्छतेचे काम एकाच कंत्राटदाराला-

मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतेचे काम एकाच कंत्राटदाराला देण्याचा वादग्रस्त निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र अजून एकही कंत्राटदार पुढे आलेला नाही.

Web Title: along with andheri gokhale bridge will there be an inquiry into road concreting and coastal by bmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.