अबू आझमी यांच्या संपत्तीत ५ वर्षांत ३४ टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 03:47 AM2019-10-03T03:47:42+5:302019-10-03T03:48:10+5:30
महाराष्ट्र राज्य विधानसभेमध्ये समाजवादी पार्टीचे प्रतिनिधित्व करीत असलेले प्रदेशाध्यक्ष अबू आझमी गतवेळेप्रमाणे यंदाही ‘टॉप थ्री’श्रीमंत उमेदवारांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य विधानसभेमध्ये समाजवादी पार्टीचे प्रतिनिधित्व करीत असलेले प्रदेशाध्यक्ष अबू आझमी गतवेळेप्रमाणे यंदाही ‘टॉप थ्री’श्रीमंत उमेदवारांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. २०१४ च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत तब्बल ३३.९६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०९ कोटी संपत्ती असल्याचे त्यांनी निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे.
२०१४ च्या निवडणुकीवेळी अबू आझमी यांनी १५६.११ कोटी इतकी संपत्ती जाहीर केली होती. त्या वेळी भाजपचे मोहित कंबोज (३५३.३३) व मंगल प्रभात लोढा (१९८.६१) यांच्यानंतर ते श्रीमंत उमेदवार ठरले होते. अद्याप या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत. त्यांच्या संपत्तीमध्ये पाच वर्षांत किती वाढ झाली की घट झाली, हे समजू शकलेले नाही.
सपाचे प्रदेशाध्यक्ष असलेले अबू आझमी हे मानखुर्द-शिवाजीनगर (१७१) विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्ट्रिक नोंदविण्याचा प्रयत्नात आहेत. २००९ व २०१४ मध्ये त्यांनी बहुमताने निवडणूक जिंकली होती. गेल्या वेळी कॉँग्रेस व राष्टÑवादीचे उमेदवार विरोधात होते. या वेळी कॉँग्रेस आघाडीने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आझमींनी मंगळवारी दाखल केलेल्या संपत्तीमध्ये त्यांची एकूण वैयक्तिक संपत्ती १९५ कोटी इतकी आहे. त्यांच्या पत्नीकडे १४ कोटींची रोकड व दागदागिने आहेत. आपल्यावर ९.०९ कोटी इतके कर्ज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आझमी यांच्या मालकीची विविध हॉटेल्स, मनुष्यबळ सल्लागार कंपनीचे संचालक व त्या कंपन्यांमधील गुंतवणूक हे त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत.
आझमी यांच्याविरुद्ध एकूण ११ फौजदारी खटले दाखल असून त्यामध्ये खंडणी, विक्री कर अनियमितता, चिथावणीखोर भाषण, फौजदारी धमकी, प्राणघातक हल्ला आणि दंगली अशा प्रकरणांचा समावेश असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.