खोकला आणि कोरोना पूर्वतयारीने गाजविले वर्ष, आरोग्य क्षेत्रात विविध घडामोडी

By संतोष आंधळे | Published: December 31, 2023 12:51 PM2023-12-31T12:51:25+5:302023-12-31T13:03:44+5:30

विशेष म्हणजे, नागरिकांना हा आजार झाल्यानंतर त्याला व्हायरल असल्याचे लेबल वैद्यकीय तज्ज्ञांनी चिटकविल्यामुळे नागरिकांच्या मनातील या आजाराविषयाची भीती बऱ्यापैकी कमी झाली होती. 

A year dominated by cough and corona preparedness, various developments in the health sector | खोकला आणि कोरोना पूर्वतयारीने गाजविले वर्ष, आरोग्य क्षेत्रात विविध घडामोडी

खोकला आणि कोरोना पूर्वतयारीने गाजविले वर्ष, आरोग्य क्षेत्रात विविध घडामोडी

 मुंबई : २०२३ या वर्षाची सुरुवात झाली ती मुळातच सर्दी- खोकल्याने आणि तापाने. या वर्षभर घरटी एक माणूस तरी सर्दी- खोकला असल्याचे तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जाताना दिसत होता. गेले अनेक वर्ष कुठलाही आजार न होणाऱ्या बहुतांश ठणठणीत व्यक्तींना सर्वसाधारण असणाऱ्या या आजाराच्या लक्षणांनी पछाडले होते. कोव्हीड-१९, स्वाइन फ्लू आणि इन्फ्लुएंझा  या विषाणूमुळे होणाऱ्या आजाराने नागरिक त्रस्त झाले होते. विशेष म्हणजे, नागरिकांना हा आजार झाल्यानंतर त्याला व्हायरल असल्याचे लेबल वैद्यकीय तज्ज्ञांनी चिटकविल्यामुळे नागरिकांच्या मनातील या आजाराविषयाची भीती बऱ्यापैकी कमी झाली होती. 

घशाची खवखव, धाप लागणे आणि न्यूमोनियासारख्या आजारापासून बचाव करत वर्ष काढत असताना वर्षाअखेर पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडले जाऊ लागले. कोरोनाच्या नवीन जेएन १ या नवीन व्हेरिएंटने राज्यात शिरकाव केल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आहे. त्यामुळे कोरोनाची पूर्वतयारी ‘रिस्टार्ट’ करण्यात आली आहे. राज्यातील आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहे. राज्यातील अनेक भागात रुग्ण दिसू लागल्याने म्हणून आरोग्य विभागाला मार्गदर्शन करण्यासाठी नवीन टास्क फोर्सची स्थापना करून त्याची सूत्रे माजी आयसीएमआर प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांच्याकडे दिली आहे.

टाटा रुग्णालयात प्रोटॉन थेरपी 
कॅन्सरच्या रुग्णाच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावणारी प्रोटॉन थेरपी टाटा रुग्णालयाच्या खारघर येथील रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. त्या उपचार पद्धतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या अशा पद्धतीचे उपचार देणारे टाटा रुग्णालय हे देशातील पहिले सार्वजनिक रुग्णालय आहे. रुग्णांना उपचाराचा भाग म्हणून जे रेडिएशन दिले जाते, त्यामध्ये काहीवेळा कर्करोगाच्या पेशींबरोबर चांगल्या पेशीसुद्धा नष्ट होतात. मात्र, प्रोटॉन थेरपी केवळ कर्करोगाच्या पेशींवर टार्गेटेड थेरपी दिली जाते. यासाठी कोट्यवधी रुपयांची यंत्रणा रुग्णालयात बसविण्यात आली आहे.

औषधांचा खडखडाट कायम  
वैद्यकीय शिक्षण आणि मुंबई महापालिका या दोन्ही विभागांनी कितीही दावा केला तरी औषधांची वानवा असल्याचे अनुभव येतात.  महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व रुग्णालयांत काही प्रमाणात सगळ्यांना औषधे बाहेरूनच विकत घ्यावी लागत आहेत. रुग्णालय प्रशासनापेक्षा या रुग्णालयांना औषध पुरवठा करणारे शासनाचे वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण आणि महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी केंद्र जबाबदार असल्याचे दिसून आले आहे.     

डॉ. राजेंद्र बडवे निवृत्त
देशात कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचार देण्यासाठी प्रसिद्ध असणारे टाटा मेमोरियल सेंटरने गेल्या सात वर्षांत नवीन नऊ रुग्णालये देशातील विविध भागात सुरू केली आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व काम डॉ. राजेंद्र बडवे यावेळी सेंटरच्या संचालकपदी होते. या सेंटरचे १९ वर्षे संचालक पद त्यांनी भूषविले. काही दिवसांपूर्वीच ते या पदावरून निवृत्त झाले. त्याच्या जागी डॉ. सुदीप गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ पॉलिसी राबविण्याचे आदेश दिले होते. या आदेशामुळे आता रुग्णांना कोणतेही औषध बाहेरून विकत घेण्याची गरज भासणार नाही. पालिका रुग्णालयात दररोज लाखो रुग्ण उपचारासाठी भेटी देत असतात. झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसीमुळे महापालिकेला सध्याच्या औषध खरेदीवर होणाऱ्या खर्चापेक्षा १,४०० कोटी रुपये अधिक  खर्च करावा लागणार आहे. 
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: A year dominated by cough and corona preparedness, various developments in the health sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.