शेजाऱ्याचा ‘कार्यक्रम’ करण्याचा रचला डाव; मंत्रालयात धमकीचा फोन करणाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 11:38 AM2023-08-09T11:38:27+5:302023-08-09T11:38:35+5:30

खेमाणी हा कांदिवली पश्चिमच्या मथुरा दास रोड परिसरात राहतो. कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो राहत असलेल्या सोसायटीत एक कार्यक्रम होणार आहे, ज्याची तयारी सध्या सुरू आहे.

A plot to 'program' a neighbor; The person who called the threat to the ministry was arrested | शेजाऱ्याचा ‘कार्यक्रम’ करण्याचा रचला डाव; मंत्रालयात धमकीचा फोन करणाऱ्याला अटक

शेजाऱ्याचा ‘कार्यक्रम’ करण्याचा रचला डाव; मंत्रालयात धमकीचा फोन करणाऱ्याला अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एक-दोन दिवसांत ‘दहशतवादी हल्ला’ होईल, असे सांगून मंत्रालयाला धमकीचा फोन करणाऱ्या प्रकाश किशनचंद खेमाणी (६१) या व्यक्तीला कांदिवली पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. त्याने हा सगळा प्रकार शेजाऱ्यांकडे होणारा कौटुंबिक कार्यक्रम खराब करण्यासाठी केल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

खेमाणी हा कांदिवली पश्चिमच्या मथुरा दास रोड परिसरात राहतो. कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो राहत असलेल्या सोसायटीत एक कार्यक्रम होणार आहे, ज्याची तयारी सध्या सुरू आहे. ही बाब खेमाणी याला समजल्यानंतर त्याने सोमवारी रात्री १० वाजता मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षावर फोन केला. त्यात त्याने येत्या एक-दोन दिवसात शहरात दहशतवादी हल्ला होणार आहे, असे सांगितले. याची माहिती मंत्रालय नियंत्रण कक्ष प्रतिनिधींनी तातडीने मुंबई पोलिसांना दिली. पुढे तांत्रिक तपासात आरोपी हा कांदिवली पश्चिमचा राहणारा असल्याचे उघड झाले. 

त्यानुसार परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप विश्वासराव, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत गीते आणि पथक तपास करत खेमाणीच्या घरी पोहोचले. त्यानंतर त्याला कांदिवली पोलिस ठाण्यात आणण्यात आले. खेमाणी हा इथे तिथे फिरून कचरा गोळा करतो आणि त्याच्या घरात आणून ठेवतो. त्यामुळे पोलिस जेव्हा त्याच्या घरात गेले तेव्हा त्याठिकाणी त्यांना सर्वत्र कचरा जमा असल्याचे दिसले. 

यापूर्वी कांदिवली पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात शेजाऱ्यांना मारहाणीच्या दोन तक्रारी आल्या आहेत. त्यावरून हा फोन ‘हॉक्स कॉल’ असल्याचे उघड झाले. मात्र त्याच्या सोमवारी रात्रीच्या कॉलने मुंबई पोलिसांना रात्रभर कामाला लावले.

फोन किया 
तो क्या हुआ ?
पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारणा केल्यावर हा मैनेही फोन किया, तो क्या हुआ, असे म्हणत तो वाद घालू लागला. त्यांनी त्याला त्याच्या घरच्यांबाबत विचारणा केल्यावर कोई नही रहता मेरे साथ, सब छोड के चले गये.. असे त्याने पोलिसांना सांगितले.

Web Title: A plot to 'program' a neighbor; The person who called the threat to the ministry was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.