कौतुकास्पद! ९ वर्षांच्या ‘हिरकणी’ने लिंगाणा केला सर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 10:58 AM2023-12-30T10:58:14+5:302023-12-30T10:59:55+5:30
नाताळच्या सुट्टीची सुरुवात अनोख्या पद्धतीने.
मुंबई : महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळख असलेली ग्रिहिथा सचिन विचारे (९ वर्षे) हिने नाताळाच्या सुट्टीची सुरुवात अनोख्या पद्धतीने केली आहे. ग्रिहिथाच्या आजवरच्या यशामध्ये अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. हिंदवी स्वराज्याचे कारागृह अशी ओळख असलेला किल्ला लिंगाणा हा ग्रिहिथाने सर केला आहे. या पूर्ण मोहिमेची अजून एक विशेष बाब म्हणजे ग्रिहिथाने ही पूर्ण मोहीम पारंपरिक नऊवारी साडी नेसून पार पाडली. लिंगाणा हा चढाईस अतिशय कठीण, दमछाक करणारा व अवघड श्रेणीत गणला जाणारा किल्ला. ग्रिहिथाने एका अनोख्या पद्धतीने हा किल्ला सर केला. ग्रिहिथाने मोहरी या बेस गावापासून सुमारे दीड तासाची पायपीट करून रायलिंग पठार गाठले.
गडकिल्ल्यांची चढाई :
रायलिंग पठारावरून सुमारे १,५०० ते २,००० हजार फूट खोल दरीवर महाराष्ट्राचे आजवरचे सर्वांत लांब म्हणजेच सुमारे एक हजार फूट लांबीच्या झिप लाइनवर झिपलिंगिंग करून लिंगाणाचा पायथा गाठला.
पुढे गिर्यारोहणासाठी लागणारे सर्व साहित्य परिधान करून चढाई सुरू केली.
महाराष्ट्रातील चढाईसाठी अतिकठीण मानले जाणारे काही गडकिल्ले व सुळके (मोरोशीचा भैरवगड, मलंगगड, तैलबैला, हरिहर, वजीर सुळका, नवरानवरी सुळके इत्यादी) देखील ग्रिहिथाने सर केले आहेत.
सुमारे तीन तासांच्या कठीण चढाईनंतर ग्रिहिथाने किल्ल्याचा टॉप गाठला, तर सहा टप्प्यांत किल्ल्याचा पायथा गाठला.
अनोख्या पद्धतीने लिंगाणा सर करणे व सर्वांत कमी वयात प्रथमच एक हजार फूट झिप लायनिंग करून ग्रिहिथाने नवा विक्रम रचला आहे.
मोहिमेत ग्रिहिथाला अक्षय जमदारे, ऋषिकेश बापरडेकर, कल्पेश बनोटे, नितेश पाटील, खुशल बेंद्रे, वैभव मंचेकर व अनंता मर्गले, सूरज नेवासे, अमोल तळेकर, श्रीनाथ पवार व कृष्णा मर्गले यांनी मदत केली.
ग्रिहिथाने आजवर महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील उंच पर्वत शिखरे सर केली आहेत.