Adrushya Marathi movie Review : दृश्य-अदृश्याचा पाठशिवणीचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 04:14 PM2022-05-20T16:14:31+5:302022-05-20T16:19:26+5:30

Adrushya Marathi movie Review : ‘अदृश्य’ हा चित्रपट मागील बऱ्याच दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत होता. कबीर लालसारख्या हिंदी सिनेसृष्टीतील गाजलेल्या सिनेमॅटोग्राफरचे मराठीतील दिग्दर्शकीय पदार्पण हे यामागचं मुख्य कारण होतं.

Riteish Deshmukh Manjari Fadnis Pushkar Jog Adrushya Marathi movie Review | Adrushya Marathi movie Review : दृश्य-अदृश्याचा पाठशिवणीचा खेळ

Adrushya Marathi movie Review : दृश्य-अदृश्याचा पाठशिवणीचा खेळ

googlenewsNext

संजय घावरे
.........................

दर्जा : **  
कलाकार : पुष्कर जोग, मंजरी फडणीस, सौरभ गोखले, उषा नाडकर्णी, अनंत जोग, रितेश देशमुख (पाहुणा कलाकार)
दिग्दर्शक : कबीर लाल
निर्माता: अजय कुमार सिंग, रेखा सिंग
शैली : सस्पेंस-थ्रीलर
कलावधी : २ तास २० मिनिटे
........................

 Adrushya Marathi movie Review :    ‘अदृश्य’ ( Adrushya) हा चित्रपट मागील बऱ्याच दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत होता. कबीर लालसारख्या हिंदी सिनेसृष्टीतील गाजलेल्या सिनेमॅटोग्राफरचे मराठीतील दिग्दर्शकीय पदार्पण हे यामागचं मुख्य कारण होतं. याखेरीज मराठी असूनही हिंदीतच रमलेल्या मंजरी फडणीसचा दुसरा मराठी चित्रपट आणि रितेश देशमुखचा कॅमिओ यामुळेही या चित्रपटाबाबत उत्सुकता होती. उत्कंठावर्धक टायटलनं यात अधिकच भर घातली, पण आघाडीचे कलाकार असूनही थ्रीलर आणि सस्पेंसचा खेळ रंगवण्यात कबीर लाल तितकेसे यशस्वी झालेले नाहीत.

कथानक : 
सायली आणि सानिका या दोन जुळया बहिणींची ही कथा आहे. प्रोग्रेसिव्ह ब्लाइंडनेस या आजारानं ग्रासलेल्या सायलीनं आत्महत्या केल्यानं सानिका त्याची कारणं शोधण्यासाठी पतीसोबत डेहराडूनमध्ये येते. प्रचंड प्रेम करणारा पती लाभूनही आपल्या बहिणीच्या मृत्यूची घटना सानिकाला गप्प बसू देत नसते. जास्त स्ट्रेस आल्यानं सायलीप्रमाणे तिलाही अंधत्व येण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवलेली असते. सायलीच्या मृत्यूचं खरं कारण शोधण्याच्या प्रयत्नात सानिकाला पतीही गमवावा लागतो. अखेर सानिकालाही अंधत्वाला सामोरं जावं लागतं. एक डोनर मिळाल्यानं सानिकाच्या डोळ्यांचं ऑपरेशन होतं. त्यानंतर खऱ्या अर्थानं रहस्यांचे पैलू उलगडणाऱ्या थ्रीलरचा खेळ सुरू होतो.

लेखन दिग्दर्शन :

पटकथेची ढिसाळ बांधणी या चित्रपटाला मारक ठरली आहे. रहस्याचा उलगडा शेवटपर्यंत होत नसला तरी त्यानंतर देण्यात आलेली कारणं न पटणारी आहेत. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. त्यामुळं पदार्पणात तरी दिग्दर्शक आपला ठसा उमटवण्यात कबीर लाल कमी पडले आहेत.

कबीर एक उत्तम डिओपी असल्यानं सिनेमॅटोग्राफी छान झाली आहे, पण प्रथमच दिग्दर्शन करताना त्यांना आणखी अभ्यास करण्याची गरज होती. काही दृश्ये अंगावर शहारे आणण्यात यशस्वी होतात, पण एकाच कथानकात बऱ्याच गोष्टी घुडसण्यात आल्यानं गोंधळ झाला आहे. सानिकाच्या पतीनं आत्महत्या केल्याचं दाखवण्यात आलंय, पण खलनायक त्याची हत्या कशी करतो याचा उलगडा होत नाही. मध्यंतरापूर्वीपर्यंत खलनायक दृश्य आहे की अदृश्य या संभ्रमातच ठेवण्यात आलं आहे. मध्यंतरानंतरचा भाग खूपच कंटाळवाणा आणि न पटण्याजोगा झाला आहे. क्लायमॅक्स येईपर्यंत खलनायकाचा चेहरा काही कारण नसताना लपवण्यात आला आहे. शेजाऱ्यानं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, ऑपरेशननंतर लगेचच डॉक्टरांचं सानिकाला घरी पाठवणं, पुरुष केअरव्ह्यूअर येऊनही तिनं डॉक्टरांशी संपर्क न साधणं, जीवावर बेतल्यानंतरही पोलिसांऐवजी पुन्हा खलनायकालाच सांगणं या गोष्टी पटत नाहीत. पार्श्वसंगीत आणि इतर तांत्रिक बाबी चांगल्या आहेत. चित्रपटाची लांबी आणखी कमी करायला हवी होती.

अभिनय :

प्राग्रेसिव्ह ब्लाइंडनेसनं आजारी असलेल्या नायिकेची भूमिका साकारताना मंजरी फडणीसनं छान काम केलं आहे. यात जरी मंजरी दुहेरी भूमिकेत असली तरी ती फार काळासाठी नाही. मध्यंतरापर्यंतच दिसणाऱ्या पुष्कर जोगनं तिला चांगली साथ दिली आहे. सौरभ गोखलेनं साकारलेला खलनायक क्रूर वाटतो. आपल्या प्रत्येक कृतीद्वारे त्यानं खलनायक साकारला आहे. अनंत जोग यांनी साकारलेली वासनांध शेजाऱ्याची भूमिका तितकीशी गरजेची नव्हती. उषा नाडकर्णींनी साकारलेली अंध शेजारीणही चांगली झालीय. पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत रितेश देशमुख केवळ आकर्षणासाठी आहे.

सकारात्मक बाजू : कॅमेरावर्क, कलाकारांचा अभिनय आणि तांत्रिकदृष्ट्याही हा चित्रपट चांगला आहे.
नकारात्मक बाजू : पटकथेची मांडणी, न पटणाऱ्या गोष्टी आणि दिग्दर्शनातील उणीवांमुळं कंटाळवाणा वाटतो.

थोडक्यात :

रहस्य आणि थरार यांचा अचूक ताळमेळ बसवण्यात अपयशी ठरलेल्या या चित्रपटात फार काही विशेष नाही. त्यामुळं हा सिनेमा आवर्जून पहायलाच हवा असं सांगणं चुकीचं ठरेल.

Web Title: Riteish Deshmukh Manjari Fadnis Pushkar Jog Adrushya Marathi movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.