मुख्यमंत्री कोणीही होऊदे...विधानसभेत चालणार पाटीलकीच!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 08:31 AM2019-10-27T08:31:21+5:302019-10-27T08:41:38+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 50-50 चा फॉर्म्युलाच मागितला आहे. शिवाय 1995 प्रमाणे मंत्रीपदांचे वाटपही होणार असल्याची चर्चा आहे.

whoever be the Chief Minister... majority of Patil surname in the Assembly! | मुख्यमंत्री कोणीही होऊदे...विधानसभेत चालणार पाटीलकीच!

मुख्यमंत्री कोणीही होऊदे...विधानसभेत चालणार पाटीलकीच!

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल नुकताच जाहीर झाला. भाजपा आणि शिवसेना युतीला बहुमत मिळाले आहे. या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून रस्सीखेच रंगलेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 50-50 चा फॉर्म्युलाच मागितला आहे. शिवाय 1995 प्रमाणे मंत्रीपदांचे वाटपही होणार असल्याची चर्चा आहे. या सगळ्या धामधुमीत मुख्यमंत्री कोणीही होऊदे विधानसभेत मात्र पाटलांची सद्दी चालणार असल्याचे दिसत आहे. 


महाराष्ट्रात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. यंदा विधानसभेतील 288 आमदारांपैकी 27 जण पाटील या आडनावाचे आमदार निवडून आले आहेत. देशमुख 5 तर पवार आडनावाचे 8 जण निवडून आले आहेत. विशेष म्हणजे विधासभेच्या निर्मितीपासून केवळ दोनच आडनावांना दोन आकडी नंबर पार करता आला आहे. त्यातही पाटील आणि देशमुख ही आडनावे आहेत. मात्र, देशमुखांना हा करिष्मा केवळ दोनदाच करता आला आहे. तर पाटलांनी 1962 पासून 25 पेक्षा वरचा आकडा आजतागायत कायम ठेवला आहे. 


महत्वाचे म्हणजे 1999 च्या विधानसभेमध्ये तब्बल 38 पाटील आमदार म्हणून निवडून आले होते. तर 2009 आणि 2014 मध्ये 25 वर आकडा स्थिरावला होता. यंदा त्यात दोनने भर पडली आहे. यामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचाही नंबर आहे. तर 2014 मध्ये 4 पवार आडनावाचे उमेदवार आमदार झाले होते. यंदा त्यात दुप्पटीने वाढ झाली असून यामध्ये रोहित पवारांचाही नंबर आहे. देशमुखांच्या आकडा मात्र 8 वरून 5 वर घसरला आहे. 


अन्य आडनावे...
यंदा नाईक आडनावाचे 6, चव्हाण आडनावाचे 5, जाधव 4, शिंदे 6, कदम 3, गायकवाड 3 असे निवडून आले आहेत.  

संजय नावाचे 12 आमदार....

यंदा विधानसभेमध्ये आडनावांसोबत नावेही एकसारखी आहेत. संजय नावाचे 12 आमदार यावेळी निवडून आले आहेत. 1985 मध्ये पहिला संजय नावाचा आमदार निवडून आला होता. यानंतर हा आकडा 3, 5, 10 करत 12 वर स्थिरावला आहे.

Web Title: whoever be the Chief Minister... majority of Patil surname in the Assembly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.