मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 06:13 AM2024-05-08T06:13:54+5:302024-05-08T06:14:10+5:30

सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात प्रचारादरम्यान कधी नव्हे तो प्रथमच कलगीतुरा रंगला. दोघांनी एकमेकांवर टीकेचे बाण सोडले. मात्र, राजकारण बाजूला ठेवत आज सुळे यांनी काकी आशाताई पवार यांची भेट घेत आश्चर्याचा धक्का दिला आहे.  

Twist of relations in Baramati on election day, Supriya Sule meets Ajit Pawar's mother; So Ajit Pawar said... Meri maa mere saath hai! | मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!

मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!

लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : बारामती मतदारसंघात नणंद-भावजयमध्ये लक्षवेधी लढत होत असून मंगळवारी मतदानादिवशी खासदार सुप्रिया सुळे मतदानानंतर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांच्या निवासस्थानी पोहचल्या. सुळे यांची ‘सरप्राइज व्हिजिट’ चर्चेचा विषय बनली. 

सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात प्रचारादरम्यान कधी नव्हे तो प्रथमच कलगीतुरा रंगला. दोघांनी एकमेकांवर टीकेचे बाण सोडले. मात्र, राजकारण बाजूला ठेवत आज सुळे यांनी काकी आशाताई पवार यांची भेट घेत आश्चर्याचा धक्का दिला आहे.  

निवासस्थानाबाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सुळे म्हणाल्या, आशाकाकी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आले  होते. त्यावेळी आम्ही दोघीच त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्यांची थोडावेळ भेट घेऊन बाहेर पडले. पत्रकारांनी तुम्ही अजित पवारांच्या घरी आलात, असा प्रश्न केला. त्यावर सुळे यांनी हे माझ्या काका-काकीचे घर आहे, माझे लहानपण याच घरी गेले. दोन दोन महिने मी या ठिकाणी राहत असे. जेवढे माझ्या आईने माझ्यासाठी केले, तेवढेच माझ्या सर्व काकींनी माझ्यासाठी केले आहे.

काटेवाडी येथे मतदान केल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. माझ्या कुटुंबामध्ये माझी आई सर्वोच्च आहे. त्यामुळे इतर सदस्य कोण बरोबर नाही यांची मला चिंता नाही असे सांगत ‘मेरी माँ मेरे साथ है...’ असे सूचक वक्तव्य केले. निकालानंतर ‘अजितदादां’नी मिशी काढण्याची तयारी ठेवावी, असा टोला बंधू श्रीनिवास पवार यांनी मारला होता. त्यावर, तो माझा लहान भाऊ आहे. त्याने दहा वर्षांपूर्वी मिशी काढली आहे. अजून कशाकशाची नक्की वाट पाहतोय तो, असा प्रतिटोला पवार यांनी लगावला.

पवार कुटुंब एकत्र येणार?
सुप्रिया सुळे यांच्या या भेटीमुळे पवार कुटुंब निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येणार का, याबाबत चर्चा रंगली आहे. निवडणुकीत दुभंगलेले पवार कुटुंब बारामतीकरांनी अनुभवले. या भेटीने पुन्हा पवार कुटुंबाचा एकोपा नव्याने निर्माण होण्यास मदत होणार का, अशीही चर्चा सुरू आहे. .

मतदानाच्या रांगेतच वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू
कोल्हापूर : उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर महादेव श्रीपती सुतार (६९, मूळ रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) हे रांगेतच चक्कर येऊन कोसळले. नातेवाइकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. 
या घटनेमुळे मतदान केंद्राच्या परिसरात काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. महादेव सुतार हे मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पुतण्यासोबत मतदानासाठी घरातून बाहेर पडले होते. रमाबाई आंबेडकर शाळेतील केंद्रावर त्यांचे मतदान होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

आठ गावांचा बहिष्कार मागे
धाराशिव : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी झालेल्या मतदानप्रक्रियेत सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३ टक्के इतके मतदान झाले. स्थानिक मुद्द्यांवरून धाराशिव जिल्ह्यातील ८ गावे, तांडे, वस्त्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. सोमवारपर्यंत यातील ६ गावांनी आपला बहिष्कार मागे घेतला. मात्र, दोन गावे ठाम राहिली.

मंगळवारी सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनीही बहिष्कार मागे घेतला. धाराशिव शहरातील भीमनगर भागातील मतदान केंद्रावरील बिघाड लक्षात आल्यानंतर अर्धा तास मतदानाची प्रक्रिया ठप्प होती. तर वाशी शहरातील पाच मतदान केंद्रांवर पहिल्या बॅलेट युनिटच्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचे बॅलेट युनिट ठेवल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात आल्यानंतर हा क्रम सुधारून घेण्यात आला.

Web Title: Twist of relations in Baramati on election day, Supriya Sule meets Ajit Pawar's mother; So Ajit Pawar said... Meri maa mere saath hai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.