संजय राऊत भाजपा नेत्याच्या भेटीला! काँग्रेसमुळे ठाकरे गट कोंडीत; तर्क-वितर्कांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 10:15 AM2024-04-06T10:15:59+5:302024-04-06T10:23:20+5:30

Sanjay Raut News: सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस कुणीही माघार घेण्याच्या तयारीत दिसत नाही. यातच संजय राऊंतांनी भाजपा नेत्यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.

thackeray group mp sanjay raut meets bjp vilasrao jagtap for sangli lok sabha election 2024 discussion started in politics | संजय राऊत भाजपा नेत्याच्या भेटीला! काँग्रेसमुळे ठाकरे गट कोंडीत; तर्क-वितर्कांना उधाण

संजय राऊत भाजपा नेत्याच्या भेटीला! काँग्रेसमुळे ठाकरे गट कोंडीत; तर्क-वितर्कांना उधाण

Sanjay Raut News: सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसपूस सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चांगलेच नाराज झाले आहेत. सांगलीच्या जागेवर तडजोड करण्यास ठाकरे गट तयार नाही. मात्र, काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भाजपा नेत्याच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीची जागा सोडण्यास काँग्रेस तयार नाही. या जागेवर उमेदवार जाहीर करताना आम्हाला विश्वासात घेतलेले नाही, असे सांगत काँग्रेस नेत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सांगलीच्या जागेचा मुद्दा काँग्रेसने दिल्लीच्या नेत्यांकडे मांडला आहे. ही जागा काँग्रेसला न मिळाल्यास आम्ही चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतल्याचे दिसत आहे. कारण, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्यावेळी काँग्रेसचे नेत्यांनी गैरहजर राहणे पसंत केले. तर ठाकरे गटही सांगलीची जागा सोडायला तयार नाही. अशातच या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने काँग्रेसचे समर्थन केल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाने विश्वासात न घेतल्याबाबत खंत व्यक्त केली आहे.

संजय राऊत भाजपा नेत्याच्या भेटीला! 

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपा नेत्याची भेट घेतल्याचे वृत्त आहे. भाजपाने सांगली येथून संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करत विरोध केला आहे. तसेच संजयकाका पाटील यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याच विलासराव जगताप यांची जत येथे जाऊन संजय राऊतांनी भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

दरम्यान, संजय राऊत आणि विलासराव जगताप यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाची चांगलीच पंचाईत झाली आहे. असे असतानाच संजय राऊत यांनी भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांची भेट घेतली. या भेटीचा नेमक उद्देश काय होता? सांगली जिल्ह्याचा तिढा सोडवण्यासाठी ही भेट झाली का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
 

Web Title: thackeray group mp sanjay raut meets bjp vilasrao jagtap for sangli lok sabha election 2024 discussion started in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.