"उपचारासाठी मलिकांना जामीन, अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी नाही; जेलमध्ये पाठवा"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 12:31 PM2023-12-08T12:31:31+5:302023-12-08T12:32:04+5:30

तात्काळ मलिकांना अटक करून आर्थर रोड जेलमध्ये पाठवावे असं कंबोज यांनी म्हटलं आहे. 

Supreme Court Should Cancel Nawab Malik bail, Mohit Kamboj Demand | "उपचारासाठी मलिकांना जामीन, अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी नाही; जेलमध्ये पाठवा"

"उपचारासाठी मलिकांना जामीन, अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी नाही; जेलमध्ये पाठवा"

मुंबई - हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होताच नवाब मलिकांच्या हजेरीनं राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मलिक सत्ताधारी बाकांवर बसल्याने विरोधकांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर फडणवीसांनी जाहीर पत्र काढून मलिकांना सोबत घेणे योग्य नाही अशी नाराजी अजित पवारांकडे व्यक्त केली. त्यातच आता फडणवीसांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे मोहित कंबोज यांनी मलिकांना जामीन रद्द करावा अशी मागणी केली आहे. 

मोहित कंबोज यांनी ट्विट करत म्हटलंय की, सुप्रीम कोर्टाने मलिकाचा जामीन रद्द करावा. मलिक यांना केवळ वैद्यकीय उपचारासाठी जामीन मिळाला होता. अधिवेशनात हजर राहण्यासाठी नाही. मलिकांकडे पाहून त्यांची तब्येत एकदम फर्स्टक्लास असल्याचे दिसते. त्यांना कुठल्याही उपचाराची गरज नाही. त्यामुळे तात्काळ मलिकांना अटक करून आर्थर रोड जेलमध्ये पाठवावे असं त्यांनी म्हटलं आहे. 

देवेंद्र फडणवीस पत्रात नेमके काय म्हणाले?

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकारसुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीयआधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे. हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो. त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे. असे फडणवीस यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.

तर  सभागृहात कोणी कुठे बसायचं, याबाबतचा निर्णय सरकारच घेत असतं. नवाब मलिक जर सत्ताधारी बाकावर बसले होते, तर त्यांची तिथं बसण्याची व्यवस्था नक्की कोणी केली होती, याच्या तळाशीही पत्रकार बांधवांनी गेलं पाहिजे. याबाबत विधानसभा अध्यक्ष अधिकृत माहिती देऊ शकतील. आमच्याकडे राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांचं प्रतिज्ञापत्र आहेत. नवाब मलिक यांचंही प्रतिज्ञापत्र आमच्याकडे आहे. नवाब मलिक हे पक्षाचे नेते आहते आणि पक्षही त्यांच्यासोबत आहे असं विधान आमदार अमोल मिटकरींनी केले आहे. 


 

Web Title: Supreme Court Should Cancel Nawab Malik bail, Mohit Kamboj Demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.