शरद पवारांच्या भेटीनंतर आर. आर. पाटलांचे सुपुत्र रोहित म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 03:42 PM2019-10-30T15:42:37+5:302019-10-30T16:08:44+5:30

आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. 

Rohit Patil met NCP chief Sharad Pawar in Baramati | शरद पवारांच्या भेटीनंतर आर. आर. पाटलांचे सुपुत्र रोहित म्हणाले....

(फोटो साभार - फेसबुक)

googlenewsNext
ठळक मुद्देआर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली.  शरद पवार यांच्याकडून सगळ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत - रोहित पाटील गोविंद बागेत पवारांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेली गर्दी ही पवारांच्या कामाची पोचपावती आहे असं रोहित यांनी म्हटलं

बारामती - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांसोबत बारामतीत दिवाळी साजरी केली. शरद पवार पाडव्यानिमित्त गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला भेटतात. त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतात. ही परंपरा त्यांनी अनेक वर्षांपासून जपली आहे. त्यानुसार यंदाही हजारोच्या संख्येने कार्यकर्ते पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनीही यावेळी शरद पवार यांची भेट घेतली. 

शरद पवार यांच्याकडून सगळ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. गोविंद बागेत पवारांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेली गर्दी ही पवारांच्या कामाची पोचपावती आहे असं रोहित पाटील यांनी म्हटलं आहे. पवारांची भेट घेतल्यानंतर एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना रोहित यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. 'गोविंदबागेमध्ये पहिल्यांदाच पवारांना शुभेच्छा द्यायला आलो आहे. गेल्या पन्नास वर्षांमध्ये शरद पवार हे राजकारणामध्ये सक्रीय आहेत. त्यांच्या कार्याची खरी पोचपावती मला बघायला मिळाली आहे. या वयामध्ये शरद पवार उभं राहून शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येकाची भेट घेतात. शरद पवारांकडून सगळ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट मी त्यांना गोविंदबागेत भेटल्यानंतर शिकतो ती म्हणजे न थकता अवितरत काम करायचं असतं' असं रोहित यांनी म्हटलं आहे.

 

आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी यंदाच्या निवडणूक प्रचारात सक्रीय सहभाग घेतला होता. रोहित यांच्या रुपात अनेकांना आबाचा भास होतो. त्यामुळे रोहित यांच्या साधेपणाचा आणि भाषणाचा प्रभाव मतदारसंघातील प्रचारात जाणवला आहे. सुमन पाटील यांनी तासगाव-कवठे महंकाळ मतदारसंघातून विजय मिळवत शिवसेनेच्या अजितराव घोरपडे यांचा पराभव केला आहे. रोहित पाटील यांना तरुणांना काय संदेश द्याल असा प्रश्न विचारला. त्यावर समाजकारण जरुर करावं पण त्याआधी स्वत: च्या पायावर उभं राहावं. स्वत:च्या कुटुंबाला उभं करावं मगच समाजकारणामध्ये उतरावं असं म्हटलं आहे.

2014 पेक्षा यावर्षी जनतेने अधिक चांगल्या विचारांच्या मागे उभं राहायचं ठरवलं आहे. येणाऱ्या काळात हाच प्रभाव आणखी जास्त वाढलेला दिसेल असं देखील रोहित यांनी म्हटलं आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यात स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र रोहित पाटील यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. रोहित पाटील यांची वक्तृत्वशैली हुबेहूब आर. आर. पाटील यांच्यासारखी आहे. रोहित यांनी जनमानसात लोकप्रियता मिळवली आहे. या निवडणुकीत सुमनताईंच्या प्रचाराची धुरा सांभाळून 2024 च्या विधानसभा निवडणुकीची मशागत करण्यासाठी राष्ट्रवादीने आतापासूनच रोहित पाटील यांच्यासाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. 

 

Web Title: Rohit Patil met NCP chief Sharad Pawar in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.