खडसेंकडून भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा; मात्र गिरीश महाजनांनी केला घणाघाती हल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 09:16 PM2024-04-07T21:16:56+5:302024-04-07T21:19:04+5:30
एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केल्यानंतर महाजन यांनी शेलक्या शब्दांत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
BJP Girish Mahajan ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पुढील १५ दिवसांत मी स्वगृही परतणार असल्याची घोषणा आज खडसे यांनी पत्रकार परिषदेतून केली. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची उत्तर महाराष्ट्रातील ताकद आणखी वाढणार आहे. मात्र त्याचवेळी पक्षांतर्गत गटबाजीतही भर पडणार आहे. कारण खडसे यांचा भाजपचे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते असलेल्या गिरीश महाजनांसोबत मागील काही वर्षांपासून टोकदार राजकीय संघर्ष सुरू आहे. अशातच आज खडसे यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केल्यानंतर महाजन यांनी शेलक्या शब्दांत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता गिरीश महाजन म्हणाले की, "खडसेंकडे गावातील ग्रामपंचायतही नाही. त्यांच्या पत्नीचा पराभव झालाय, विधानसभा निवडणुकीत त्यांची मुलगीही पराभूत झाली आहे, बँकची सत्ताही गेली, आता त्यांच्याकडे काय राहिले आहे? जो दिवा विझलेला आहे, त्यांच्याबद्दल तुम्ही एवढं का विचारता?" असा सवाल महाजन यांनी केला आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी आज अधिकृतरित्या भाजपमध्ये करणार असल्याची घोषणा केलेली असतानाही गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर खरमरीत शब्दांत टीका केल्याने आगामी काळात जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
भाजप प्रवेशाबद्दल बोलताना काय म्हणाले एकनाथ खडसे?
"माझ्या संकटाच्या काळात शरद पवार यांनी मला साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, पण आता मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. माझी भाजपमधील जुन्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांसोबत अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. त्यांचं म्हणणं होतं की मी पुन्हा भाजपमध्ये यायला हवं. मात्र मी याबाबतचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचं त्यांना कळवलं होतं. परंतु मी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आणि पुढील १५ दिवसांच्या आत माझा भाजप प्रवेश होईल," अशी माहिती खडसे यांनी आज दिली आहे.