“भाजपाबाबत जनतेच्या मनात संताप, लोकसभेला मविआ ३२ ते ३५ जागा जिंकेल”; जयंत पाटलांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 04:07 PM2024-04-16T16:07:10+5:302024-04-16T16:08:23+5:30
NCP Sharad Pawar Group Jayant Patil News: एकास एक लढत झाल्यास भाजपाचा पराभव शक्य आहे. सांगलीच्या निर्णयाबद्दल बोलणे योग्य नाही. काही लोकांचे हेतू वेगळे असतात, असे सूचक विधान जयंत पाटील यांनी केले.
NCP Sharad Pawar Group Jayant Patil News: राज्यातील जनतेच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल संताप आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने लोक वाट बघत असून, त्यांचा कल मतदानातून दिसून येईल. राज्यात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत असून, लोकसभेला ३२ ते ३३ जागा मिळतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.
सांगलीबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी काय केले, हे बघितले पाहिजे. योग्य लढत व्हावी, हा माझा प्रयत्न आहे. भाजपाविरोधात ताकद एकत्र करण्याचे काम केले पाहिजे. राज्यस्तरीय बैठकांतून काय झाले, हे आता बाहेर सांगणे योग्य होणार नाही. जे लोक वावड्या उठवत आहेत, त्यांनी आत्मचिंतन करावे, एकास एक लढत व्हावी, अशी माझी भूमिका आहे. अर्ज माघारीपर्यंत काहीही होऊ शकते, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
सांगलीच्या निर्णयाबद्दल बोलणे योग्य नाही
सांगलीच्या निर्णयाबद्दल बोलणे योग्य नाही. काही लोकांचे हेतू वेगळे असतात, सांगलीबाबत त्या-त्या वेळी सगळं सांगितलं आहे. कोल्हापूरबाबत स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाहू महाराजांना उमेदवारी दिली आहे. सगळ्यांनी एकसंधपणा दाखवला पाहिजे. मतांची विभागणी होऊ नये, असे आमचे मत आहे. विशाल पाटील यांच्या संपर्कात आहे, त्यांच्याशी बोलणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
दरम्यान, एकास एक लढत झाल्यास भाजपाचा पराभव शक्य आहे. सांगलीबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला असल्याने आता कोणी वेगळी भूमिका घेऊ नये. सांगलीत योग्य लढत व्हावी, यासाठी पुढाकार घेतला होता. एकसंधपणे आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहावे. इतिहासातील वाद नको, भविष्याचा विचार करावा. ही निवडणूक म्हणजे शेवटची नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.