भाजपवासी नमिता मुंदडांसाठी राष्ट्रवादीच्या माजी नेत्यांची यंत्रणा लागली कामाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 11:49 AM2019-10-18T11:49:20+5:302019-10-18T11:50:51+5:30

धस यांचे राजकीय कसब आणि आडसकर यांचे मतदार संघात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे नमिता यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. एकूणच नमिता अडचणीत दिसत असल्या तरी भाजप नेत्यांनी केलेली तटबंदी त्यांना फायद्याची ठरू शकते.

Namita munda contest from bjpin kage vidhan sabha election 2019 | भाजपवासी नमिता मुंदडांसाठी राष्ट्रवादीच्या माजी नेत्यांची यंत्रणा लागली कामाला

भाजपवासी नमिता मुंदडांसाठी राष्ट्रवादीच्या माजी नेत्यांची यंत्रणा लागली कामाला

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी सोडून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरलेल्या नमिता मुंदडा सध्या अडचणीत दिसत आहेत. राष्ट्रवादीची मते आपल्यासोबत येईल, अशी आशा ठेवून भाजपमध्ये गेलेल्या नमिता यांची वाट धनंजय मुंडे यांच्या झंझावती दौऱ्यामुळे खडतर दिसत आहे. मात्र राष्ट्रवादीतूनच भाजपमध्ये गेलेले सुरेश धस आणि रमेश आडसकर मदतीला धावल्यामुळे नमिता यांचे पारडे पुन्हा जड झाले आहेत.

नमिता मुंदडा यांच्या भाजप प्रवेशामुळे केजमधील निवडणूक एकतर्फी होईल अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होती. राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेते पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देऊन आव्हान उभे केले. याला धनंजय मुंडे यांनी साथ देत साठे यांच्यासाठी आपली ताकत उभी केली आहे. त्यामुळे केजच्या लढतीतील चुरस वाढली आहे.

मतदार संघात वंजारी समाजाचे 80 हजारहून अधिक मतदान आहे. त्यामुळे वंजारी समाजाचे मतदान विजयासाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे. 2014 पासून केज मतदारसंघावर भाजपचे प्राबल्य वाढले आहे. मात्र विद्यमान आमदार संगिता ठोंबरे यांना डावलून नमिता मुंदडांना उमेदवारी देणे ही बाब विचार करायला लावणारी आहे. अर्थात मतदार संघातील स्थिती भाजपसाठी तितकीशी पोषक नसल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान धस आणि आडसकर यांनी नमिता यांच्या विजयासाठी पुढाकार घेतल्यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे. मुंदडा कुटुंबीयांनी राष्ट्रवादी सोडण्यासाठी धनंजय मुंडे यांना दोष दिला होता. त्यानंतर, आता धनंजय मुंडे खुद्द मुंदडा यांच्याविरुद्ध मैदानात उतरले असून पृथ्वीराज साठे यांच्यासाठी मतं मागत आहेत. मात्र धस यांचे राजकीय कसब आणि आडसकर यांचे मतदार संघात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे नमिता यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे. एकूणच नमिता अडचणीत दिसत असल्या तरी भाजप नेत्यांनी केलेली तटबंदी त्यांना फायद्याची ठरू शकते.

 

Web Title: Namita munda contest from bjpin kage vidhan sabha election 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.