ओबीसी नेतेही आता एकवटले, छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आज पार पडणार बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 09:07 AM2024-01-28T09:07:04+5:302024-01-28T09:08:19+5:30
Maratha Reservation: मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असतानाच दुसरीकडे ओबीसी समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. याविरोधात ओबीसी नेते एकवटले असून त्यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे.
मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असतानाच दुसरीकडे ओबीसी समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. याविरोधात ओबीसी नेते एकवटले असून त्यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे.
सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांनी आपला विरोध जाहीरपणे दर्शविला असतानाच रविवारी ओबीसी नेत्यांची तातडीची बैठक रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत राज्यभरातील ओबीसी नेते उपस्थित राहणार असून या बैठकीत पुढील रणनीतीबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
अधिसूचनेची राज्यभरात होळी करणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी याबाबत आपल्या तीव्र भावना जाहीर केल्यानंतर ओबीसी समाजाचे नेते आणि आमदार प्रकाश शेंडगे यांनीही याविरोधात नाराजी व्यक्त करतानाच आमच्या पाठीत सरकारने खंजीर खुपसला, अशी टीका केली. तर त्याचवेळी या अधिसूचनेची राज्यभरात होळी करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
- या निर्णयाविरोधात राज्यभरातील ओबीसी समाजातील नेते एकवटले असून रविवारी मुंबईत तातडीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी दिली.
- या बैठकीची घोषणा करतानाच छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने आज काही बेकायदेशीर आणि ओबीसींवर अन्याय करणारे निर्णय जाहीर केले.
- सरकार जरी दबावाला बळी पडले असले तरी आम्ही गप्प बसणार नाही. ओबीसी समाजावरील या अन्यायाविरोधात आम्ही जोरदार आवाज उठवणार आहोत.
- लवकरच ओबीसींच्या पुढील संघर्षाची दिशा ठरवली जाईल. त्यासाठी रविवार, २८ जानेवारीला सांयकाळी ५ वाजता मुंबई येथील सिद्धगड बी ६ या शासकीय निवासस्थानी ओबीसींसह सर्व मागासवर्ग समाजाच्या नेत्यांशी बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
उद्या कोणीही मुंबईला मोर्चे घेऊन येईल:भुजबळ
नाशिक - ओबीसींच्या बाबतीत जो निर्णय झाला तसाच निर्णय दलित आणि आदिवासींच्या बाबतीतदेखील घडू शकतो. कोणीही मुंबईवर मोठे मोर्चे घेऊन आले तर त्यांना आदिवासी आणि दलित समाजात आरक्षण मिळू शकेल, त्यामुळे मूळ जाती-जमातींनादेखील नव्याने मागणी करणाऱ्यांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
आरक्षण कधी ते मुख्यमंत्र्यांना विचारा
जरांगे-पाटील यांचे अभिनंदन. आता फक्त आरक्षण मिळायचे बाकी आहे. ते कधी मिळणार हेपण मुख्यमंत्र्यांना विचारा. म्हणजे आपल्या मराठा बांधवांना खरी परिस्थिती समजेल. लोकसभेपूर्वी पारदर्शकता येईल ही अपेक्षा.
- राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
ओबीसी समाज समाधानी, आमच्यावर अन्याय नाही
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करताना ओबीसींच्या अस्तित्वाला कुठेही धक्का लावलेला नाही. त्यामुळे ओबीसी समाज समाधानी आहे. आमच्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही. सरकार आमच्याशी धोका करतोय असे वाटेल त्या दिवशी ओबीसी समाज घराघरांतून निघेल.
- बबन तायवाडे, अध्यक्ष, ओबीसी महासंघ
सुरुवात चांगली, शेवट गोड व्हावा
मराठा आरक्षणाचा निर्णय आज झाला असून हा समाजाचा विजय झाला आहे. ही आनंदाची बाब आहे; परंतु सरसकटचा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. सुरुवात चांगली झाली आहे. शेवट गोड व्हावा.
- अशोक चव्हाण,
माजी मुख्यमंत्री
मराठ्यांना फसवले; की ओबीसींना?
मराठा समाजाला आरक्षण दिले; मात्र मराठ्यांना फसवले की ओबीसींना फसवले तेच कळत नाही. त्यामुळे आरक्षण कुठून दिले, कसे दिले ते राज्य सरकारने स्पष्ट करावे, तसा खुलासा करावा.
- नाना पटोले,
प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस