Vidhan Sabha 2019: मुख्यमंत्र्यांच्या 'खास' माणसाला औसातून उमेदवारी; काँग्रेसवर पडणार का भारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 02:47 PM2019-10-01T14:47:18+5:302019-10-01T14:52:13+5:30
शिवसेनेचं वर्चस्व असूनही औसा मुख्यमंत्र्यांनी औसा मतदारसंघ मागून घेतला
मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं पहिली यादी जाहीर केली. यामध्ये १२५ जणांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह दिग्गजांचा समावेश आहे. मात्र या यादीत अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावं नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावांचा पहिल्या यादीत समावेश नाही. मात्र या यादीतील एका नावाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
शिवसेना-भाजपा युतीतील कळीचा मुद्दा असलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून अभिमन्यू पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पवार मुख्यमंत्र्यांचे ओएसडी/पीए आहेत. १९९९ आणि २००४ मध्ये शिवसेनेनं औसामध्ये बाजी मारली होती. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाला सोडण्यासाठी शिवसेना फारशी उत्सुक नव्हती. मात्र अखेर मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्यासाठी औसा मतदारसंघ मागून घेतला.
शिवसेनेला दोनदा मिळालेला विजय सोडल्यास बाकीच्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं औसात वर्चस्व राखलं. सध्या काँग्रेसचे बसवराज पाटील औसाचं प्रतिनिधीत्व करतात. बसवराज पाटील यांनी २००९ मध्येही विजय मिळवला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपकडून पाशा पटेल निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र त्यांना पराभव पत्करला. त्यामुळे आता मुख्यमंत्र्याचे ओएसडी बाजी मारणार की बसवराज पाटील वर्चस्व राखणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.