तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 09:31 AM2024-05-07T09:31:08+5:302024-05-07T09:31:37+5:30

Maharashtra Lok sabha Election Third Phase Voting: ११ मतदारसंघांत ११४ मतदान केंद्रे संवेदनशील असून यापैकी सातारा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ४० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही.  

Maharashtra Lok sabha Election Third Phase Voting: In the third phase, kings and dynasties battle for identity; Voting is going on for 11 constituencies today | तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  

तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची वैयक्तिक प्रतिष्ठा पणाला लागल्याने सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या अनुक्रमे बारामती, सोलापूरसह राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघांत मंगळवारी मतदान होत आहे. २ कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून केंद्रीय मंत्री नारायण राणे, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले, शाहू महाराज छत्रपती यांच्यासह एकूण २५८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.  

११४ मतदान केंद्रे संवेदनशील
११ मतदारसंघांत ११४ मतदान केंद्रे संवेदनशील असून यापैकी सातारा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ४० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही.  

या लढतींकडेही असेल लक्ष 
रायगड : अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उद्धवसेनेचे अनंत गीते हे तिसऱ्यांदा आमने-सामने.  
लातूर : काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे आणि भाजपचे सुधाकर शृंगारे यांच्यात सामना. इथे काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला. 
उस्मानाबाद : उद्धवसेनेचे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील या दीर भावजयीत लढत.  
माढा : शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत. ही लढत मोहिते पाटील घराण्याचे अस्तित्व ठरवणारी असेल.  
सांगली : भाजपचे संजयकाका पाटील, उद्धवसेनेचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेस बंडखोर विशाल पाटील अशा तीन पाटलांमध्ये तिरंगी लढत.    
सातारा : भाजपचे उदयनराजे भोसले यांच्याविरोधात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी लढत. उदयनराजेंसाठी प्रतिष्ठेची लढत.  
कोल्हापूर : शिंदेसेनेचे  संजय मंडलिक यांना काँग्रेसच्या शाहू छत्रपती महाराज यांनी आव्हान दिले आहे. 
हातकणंगले : स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, शिंदेसेनेचे धैर्यशील माने आणि उद्धवसेनेचे सत्यजीत पाटील सरुडकर अशी तिरंगी लढत.   

बारामतीकडे सर्वांचे लक्ष 
बारामतीत शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार रिंगणात असल्या, तरी खरा संघर्ष शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यातच आहे.

राणेंसाठी अस्तित्वाची लढाई
विधानसभेला सलग दोन पराभवांचे धनी ठरलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गची लढाई राजकीय अस्तित्वाची आहे. ते भाजपच्या चिन्हावर प्रथमच लढत आहेत. 

शिंदे यांची पत पणाला
सोलापूरमध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे विरोधात भाजप आमदार राम सातपुते यांच्यात लढत आहे. प्रणितीचे पिता काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची पत पणाला लागली आहे. 

Web Title: Maharashtra Lok sabha Election Third Phase Voting: In the third phase, kings and dynasties battle for identity; Voting is going on for 11 constituencies today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.