मविआच्या जागावाटपात उद्धव ठाकरेच भारी, काँग्रेसच्या हातात तुरी, पण खरी लढाई पुढेच...

By बाळकृष्ण परब | Published: April 6, 2024 10:00 AM2024-04-06T10:00:18+5:302024-04-06T10:04:21+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: फोडाफोडीच्या राजकारणात सरकार, पक्ष, चिन्ह, आमदार-खासदार असं बरंच काही गमावल्यानंतर लोकसभा निवडणुकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कसे सामोरे जाणार याबाबत सवाल उपस्थित केले जात होते. मात्र, या सर्व शंका-कुशंकांवर मात करत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात आपण आणि आपला पक्षच महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) नेतृत्व करणार हेही अधोरेखित केलंय. 

Maharashtra Lok Sabha Election 2024: Uddhav Thackeray's upper hand in seat allocation of Mahavikas Aghadi, Congress on the backfoot, But the real battle lies ahead | मविआच्या जागावाटपात उद्धव ठाकरेच भारी, काँग्रेसच्या हातात तुरी, पण खरी लढाई पुढेच...

मविआच्या जागावाटपात उद्धव ठाकरेच भारी, काँग्रेसच्या हातात तुरी, पण खरी लढाई पुढेच...

- बाळकृष्ण परब
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा घोळ अद्याप मिटलेला नाही. दोन्ही आघाड्यांमधील सर्वच पक्षांनी ठरावीक जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाचा विचार केल्यास मित्रपक्षांसोबत वाटाघाटीच्या मुत्सद्देगिरीमध्ये निःसंशयपणे उद्धव ठाकरे यांनी बाजी मारल्याचं दिसत आहे. आता काही जागांवरून मविआमध्ये तीव्र मतभेद उद्भवले असले तरी त्याचा फार काही विपरित परिणाम होण्याची शक्यता नाही आहे.  फोडाफोडीच्या राजकारणात सरकार, पक्ष, चिन्ह, आमदार-खासदार असं बरंच काही गमावल्यानंतर लोकसभा निवडणुकीला उद्धव ठाकरे हे कसे सामोरे जाणार याबाबत सवाल उपस्थित केले जात होते. मात्र, या सर्व शंका-कुशंकांवर मात करत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात आपण आणि आपला पक्षच महाविकास आघाडीचं नेतृत्व करणार हेही अधोरेखित केलंय. 
 
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आतापर्यंत २१ उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच आणखी एक दोन जागांवर त्यांच्याकडून उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या जागांवर नजर टाकल्यास, सर्व काही प्रतिकूल असतानाही २०१९ मध्ये महायुतीत वाट्याला आलेल्या जागांपैकी बऱ्याच जागा उद्धव ठाकरे यांनी कायम राखण्यात यश मिळवलंय. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांना जागावाटपात मिळालेल्या जागावाटपाची तुलना करायची झाल्यास त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी बाजी मारल्याचं स्पष्टपणे दिसतंय.

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर नाट्यमय घडामोडी घडून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी उदयास आली होती. तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे बदलून गेलेय. त्यातच मागच्या दोन वर्षांच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे  राज्यातील गणितं आणखीच बदलून गेली आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून खटके उडतील, त्यातून वाटाघाटीत माहीर असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते ठाकरे गटाला गुंडाळतील, उद्धव ठाकरे यांच्या तोंडाला पाने पुसतील, असे एक ना अनेक दावे केले जात होते. मात्र तसं काही घडलं नाही. उलट उद्धव ठाकरे यांनीच महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये फ्रंटफूटवर राहून बॅटिंग केलीय. 

मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधातच निवडणूक लढवली होती. त्यामुळे जागावाटपात अनेक जागांवरून मविआमध्ये मतभेद होणं साहजिकच होतं. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या जागावाटपात आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर आपलं नाणं खणखणीत वाजवावं लागेल आणि त्याचा दिल्लीस्थित काँग्रेसच्या हायकमांडवर प्रभाव पाडावा लागेल, हे उद्धव ठाकरे यांनी पुरेपूर जाणलं होतं. त्या कामी संजय राऊत यांचं दिल्ली दरबारातील वजन उद्धव ठाकरेंच्या चांगलंच कामी आलंय. तसेच, सध्या प्रत्येक मित्रपक्ष महत्त्वाचा बनलेला असल्याने काँग्रेस हायकमांड कितीही इच्छा असली तरी ठरावीक मर्यादेपलिकडे आपल्यावर दबाव आणणार नाही, याचीही त्यांना कल्पना होती. त्यामुळेच राज्यातील काँग्रेस नेत्यांचा दबाव झुगारून लावत उद्धव ठाकरे यांनी सांगलीसह मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई उत्तर मध्यमध्ये आपले उमेदवार उतरवले. विशेषत: सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेसच्या विरोधाचा उद्धव ठाकरे यांनी ज्या आक्रमकपणे सामना केला ती बाब काँग्रेसची डोकेदुखी वाढवणारी आहे.  

खरं तर, आतापर्यंतचा राजकीय इतिहास पाहिल्यास काँग्रेस आपल्या वाट्याची एकही जागा कधीही सोडत नाही. मात्र सध्या उद्धव ठाकरेंबाबत काँग्रेसची अवस्था ही धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात दिल्लीतून काही फार मोठा आदेश येईल, अशी शक्यता नाही. तसेच पक्षफुटीनंतरही जोमाने उभ्या राहिलेल्या उद्धव ठाकरे यांचा हात सोडणे काँग्रेसला सध्यातरी परवडणारे नाही. त्यामुळे किमान लोकसभा निवडणुकीत तरी काँग्रेसला महाराष्ट्रात ठाकरे गटाकडून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत निवडणूक लढवण्याशिवाय पर्याय दिसत नाही.

दुसरीकडे, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीलाही स्वत:वर कुठलाही दोषारोप न घेता दूर करण्यातही उद्धव ठाकरे यशस्वी ठरलेत. खरं तर, वंचितला सोबत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला होता. मात्र कागदावर समीकरणं कितीही छान दिसत असली तरी महाविकास आघाडीत आधीच तीन प्रमुख पक्ष असताना आणखी एका पक्षाला सामावून घेणे कठीण आहे, याचा अंदाज आघाडीतील सर्वच घटक पक्षांना होता. त्यातून चर्चांचं गुऱ्हाळ रंगलं. मात्र अखेरीच सर्वांना अपेक्षित असल्याप्रमाणे प्रकाश आंबेडकरांनी मविआमध्ये येणं टाळलं.  

आता जागावाटपात घेतलेल्या या आघाडीचा शिवसेना ठाकरे गटाला प्रत्यक्ष निवडणुकीतही फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचं कारण म्हणजे शिवसैनिकांना नफा - नुकसानीचा विचार न करता रोखठोक भूमिका घेणारा नेता नेहमीच आवडत आलाय. त्याबाबतीत या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना वरचढ ठरलेत. त्याचा फायदा शिवसेना ठाकरे गटाला शिंदे गटाच्या उमेदवारांविरोधात होणाऱ्या थेट लढतींमध्ये होऊ शकतो. शिवाय सध्याच्या परिस्थितीत जवळपास २३ पर्यंत जागा ठाकरे गटाला मिळत असल्याने त्यांच्याकडे जिंकण्याची अधिकाधिक संधी असेल. मात्र त्यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या ठाकरे गटाला मोठ्या आव्हानाचाही सामना करावा लागणार आहे. कारण समोर प्रमुख आव्हान आव्हान हे एकनाथ शिंदेंचे नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असणार आहे. आता या आव्हानाचा यशस्वीरीत्या सामना केला तर सहा महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना मोठं बळ मिळेल. अन्यथा त्यांची वाटचाल पुन्हा खडतर होईल.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Uddhav Thackeray's upper hand in seat allocation of Mahavikas Aghadi, Congress on the backfoot, But the real battle lies ahead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.