कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 01:09 PM2024-05-16T13:09:07+5:302024-05-16T13:11:59+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये एका तरुणाने कांद्याच्या मुद्यावरून प्रश्न विचारत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या तरुणाने दाखवलेल्या धाडसाची चर्चा झाली होती.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये एका तरुणाने कांद्याच्या मुद्यावरून प्रश्न विचारत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या तरुणाने दाखवलेल्या धाडसाची चर्चा झाली होती. दरम्यान, हा तरुण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. त्याबाबत शरद पवार यांना विचारलं असता शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर तो गुन्हा आहे का? या तरुण शेतकऱ्याने विचारलेला प्रश्न योग्यच होता, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
या तरुणाबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याची मन:स्थिती आत्ता काय आहे. तो अस्वस्थ आहे. देशाचे पंतप्रधान नुसतं भाषण करतात. मात्र शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या मुद्द्यांना स्पर्शही करत नाहीत. मग त्याबाबत विचारलं तर हा गुन्हा आहे का? माझ्या मते त्यानं योग्य केलं. तसेच तो माझ्या पक्षाचा आहे, असं म्हणतात, असं जर असेल तर मला त्याचा अभिमान आहे, असे शरद पवार म्हणाले.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा काल नाशिकमध्ये झाली होती. या सभेला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र मोदींचं भाषण सुरू असतानाच कांद्याच्या प्रश्नावर बोला, अशी मागणी करत एका तरुणाने गोंधळ घातला होता. त्यानंतर या तरुणाला ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, आता तो तरुण शरद पवार गटाचा असल्याची माहिती समोर आली आहे.