Maharashtra Government: राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच बोलले अजित पवार; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 09:00 AM2019-11-27T09:00:06+5:302019-11-27T09:04:14+5:30
विधान भवन परिसरात अजित पवारांचं सुप्रिया सुळेंकडून स्वागत
मुंबई: मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि राहणार, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं. उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. माझे सर्व सहकारी माझ्यासोबत आहेत. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर ते आमदारकीची शपथ घेण्यासाठी विधानभवन परिसरात पोहोचले.
काल अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर अजित पवार यांनी रात्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी सुप्रिया सुळे त्यांच्या स्वागताला दारातच उभ्या होत्या. त्यानंतर आज सकाळी विधान भवनात दाखल होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मी योग्य वेळी बोलेन. मी राष्ट्रवादीतच होतो, आहे आणि राहणार, असं म्हणत अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. सर्व सहकारी सोबत आहेत. त्यामुळे गैरसमज करून घेण्याचं कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून तसूभरही तथ्य नसलेल्या बातम्या दिल्या जात आहेत, अशा शब्दांत अजित पवारांनी प्रसारमाध्यमांबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या भेटीवरदेखील भाष्य केलं. पवार साहेब माझे नेते आहेत आणि पुढेही राहतील. मी आधीदेखील ही गोष्ट शब्द केली आहे, असंदेखील ते पुढे म्हणाले.