Maharashtra Election 2019: टोलमुक्त महाराष्ट्राच्या आश्वासनाचं काय झालं? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 08:11 PM2019-10-12T20:11:51+5:302019-10-12T20:23:01+5:30
Maharashtra Election 2019 विविध मुद्द्यांवरुन राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर तोफ
भिवंडी: भाजपानं गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपस्थित केला. लोकांना राग येत नाही. त्यांच्या मनात चीड निर्माण होत नाही. त्यामुळेच सत्ताधारी तुम्हाला गृहित धरतात. त्यामुळे तुमचा संताप मतपेटीतून व्यक्त करा, असं आवाहन राज यांनी केलं. याशिवाय मनसे प्रमुखांनी त्यांच्या भाषणातून आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरुन सरकारवर तोफ डागली.
राज्यातील जनतेला कशाचंच काही वाटत नाही. त्यामुळेच सत्ताधारी बेलगाम झाले आहेत. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्याला सक्षम विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. येत्या काळात जबाबदार विरोधी पक्षाची जबाबदारी मनसे समर्थपणे पाडेल, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी भिवंडी शहरातील प्रमुख समस्यांवर भाष्य केलं. भिवंडीतल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. तुम्ही या भागात राहतातच कसे? तुम्हाला या परिस्थितीचा राग येत नाही का?, असे प्रश्न राज यांनी उपस्थितांना विचारले.
नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना रस्ते खड्डेमुक्त होते. उत्तम काम करायचं ठरवल्यास ते होऊ शकतं. पण रस्त्यांच्या कंत्राटांमधून टक्के हवे असतील, तर मग रस्त्यांची कामं व्यवस्थित कशी काय होणार, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. गुजरातमधली टोरंट कंपनी भिवंडीत अव्वाच्या सव्वा बिल आकारते. मात्र लोकांना त्याबद्दल काहीच वाटत नाही. माझ्या भाषणाला ज्या टाळ्या वाजताहेत, तशीच एखादी टाळी टोरंट कंपनीच्या एखाद्या अधिकाऱ्याच्या गालावर वाजवली असती, तर परिस्थिती बदलली असती, असं राज ठाकरे म्हणाले.