उद्धव ठाकरेंचा 'माफीनामा' शिवसेनेसाठी करू शकतो 'कारनामा'?

By अमेय गोगटे | Published: October 12, 2019 11:51 AM2019-10-12T11:51:34+5:302019-10-12T11:53:10+5:30

Maharashtra Election 2019: सत्तेशिवाय कामं करता येणार नाहीत, हे उद्धव ठाकरेंचं लॉजिक आहे आणि ते चुकीचंही नाही. फक्त मुद्दा आहे, तो त्यांनी भाजपासोबत केलेल्या 'तडजोडी'चा. तीच शिवसैनिकांना खटकली आहे.

Maharashtra Election 2019: Uddhav Thackeray apology may create magic for shiv sena  | उद्धव ठाकरेंचा 'माफीनामा' शिवसेनेसाठी करू शकतो 'कारनामा'?

उद्धव ठाकरेंचा 'माफीनामा' शिवसेनेसाठी करू शकतो 'कारनामा'?

Next
ठळक मुद्देशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेली 'लाईन' थोडी वेगळी वाटतेय.एकच नेता आपल्या शिलेदारांची जाहीर माफी मागताना दिसतोय आणि ते आहेत उद्धव ठाकरे. जे शिवसैनिकांची नस ओळखतात, त्यांना या माफीची 'महती' कळू शकेल.

>> अमेय गोगटे

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा हळूहळू उडायला लागलाय. सगळ्याच पक्षाचे 'स्टार' प्रचारक जाहीर सभांमधून प्रतिस्पर्ध्यांवर टीकेचे वार करू लागलेत. समोरच्याचं काय चुकलं, हे प्रत्येक जण ओरडून-ओरडून सांगतोय. तुम्ही १५ वर्षांत काय केलं, याचा हिशेब महायुतीचे नेते मागताहेत, तर तुम्ही पाच वर्षांत काहीच केलं नाही, असं महाआघाडीचे नेते म्हणताहेत. तसं तर ही अशी भाषणं प्रत्येक निवडणुकीतच होतात. पण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेली 'लाईन' थोडी वेगळी वाटतेय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्या प्रचारसभेत जगावेगळं आवाहन करून आश्चर्याचा धक्का दिला. सत्ता नको, विरोधी पक्षाची धुरा द्या, अशी साद त्यांनी घातली. त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे. पण, त्यांच्या उर्वरित भाषणात टीका आणि आरोपच होते. या सगळ्या रणधुमाळीत एकच नेता आपल्या शिलेदारांची जाहीर माफी मागताना दिसतोय आणि ते आहेत उद्धव ठाकरे. काही जणांसाठी तो चेष्टेचा विषय आहे. भाजपासोबत १२४ जागांवर तडजोड करण्याआधी हा विचार करायला हवा होता, आधी चुका करायच्या, मग माफी मागायची, अशी टिप्पणी त्यावर केली जातेय. परंतु, हा माफीनामा शिवसेनेसाठी 'कारनामा' करू शकतो, असंही एक मत आहे. जे शिवसैनिकांची नस ओळखतात, शिवसैनिकांचं ठाकरे कुटुंबाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं ज्यांना ठाऊक आहे, त्यांना या माफीची 'महती' कळू शकेल.

गेली पाच वर्षं केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत असूनही शिवसेना 'विरोधका'च्या भूमिकेतच पाहायला मिळाली. नरेंद्र आणि देवेंद्र यांच्यावर विरोधकांनी जेवढी टीका केली नाही, तेवढी उद्धव ठाकरेंनी केली. परंतु, लोकसभा निवडणुकीआधी आणि आता विधानसभेसाठीही त्यांनी भाजपासोबत युती केलीय. हे सगळं सत्तेसाठी आहे, हे उघड आहे आणि उद्धव ठाकरे तसं स्पष्ट सांगतही आहेत. कारण, सत्तेशिवाय कामं करता येणार नाहीत, हे त्यांचं लॉजिक आहे आणि ते चुकीचंही नाही. फक्त मुद्दा आहे, तो त्यांनी भाजपासोबत केलेल्या 'तडजोडी'चा. लोकसभेवेळीच 'फिफ्टी-फिफ्टी'चं ठरलंय, असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं होतं. १४४ च्या खाली एकही चालणार नाही, अशा डरकाळ्या फोडल्या जात होत्या. पण, शेवटी 'मोठ्या भावा'पुढे 'छोटा भाऊ' नमला. तब्बल २० जागा कमी करत भाजपाने १२४ जागांवर शिवसेनेची बोळवण केली आणि हजारो शिवसैनिक नाराज झाले. दुसऱ्या बाजूने विचार करायचा तर, ६३ आमदार असलेल्या शिवसेनेला १२४ जागा मिळणं तसं वाईटही नाही. पण, शिवसेनेच्या माघारीचीच चर्चा झाली आणि 'अस्मितेचा विषय' आला की शिवसैनिकांचं जे होतं तेच झालं. ते चिडलेत, वैतागलेत, नाराज झालेत, काहींनी बंडाचे झेंडेही फडकवलेत. अशा परिस्थितीत, त्यांची समजूत काढण्यासाठी, त्यांचा राग शांत करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता असू शकतो, हे उद्धव ठाकरेंनी हेरलंय, असं म्हणावं लागेल. 

युतीसाठी 'तडजोड' करताना जे मतदारसंघ सोडावे लागले, तिथल्या शिवसैनिकांची, इच्छुकांची मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात पहिल्यांदा म्हटलं आणि नंतर प्रत्येक जाहीर सभेत ते हा सूर आळवत आहेत. शिवसैनिकांसमोर गुडघेच काय, मस्तकही टेकवेन, असं ते म्हणतात. मतदारांवर त्याचा कितपत परिणाम होईल माहीत नाही; पण शिवसेनेच्या शिलेदारांसाठी ही माफी भावनेचा मुद्दा ठरू शकते. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही अनेकदा अशाच पद्धतीने भावनिक साद घालून शिवसैनिकांची मनं जिंकली होती. ठाण्याच्या सभेतील त्यांच्या दंडवताचा करिष्मा आजही टिकून आहे.

उद्धव यांचं नेतृत्व त्यांच्यापेक्षा खूपच वेगळं आहे. बाळासाहेब असते तर भाजपाला मोठेपणा मिरवूच दिला नसता, अशी तडजोड केलीच नसती, असं प्रत्येकजण म्हणतोय. पण, बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून सैनिकांशी त्यांचे भावबंध जुळले आहेत. विशेष म्हणजे, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी हे नातं चांगलं जपलंही आहे. त्यामुळेच कदाचित तडजोडीबद्दल जाहीर माफी मागणं शिवसेनेसाठी फायदेशीर ठरू शकेल. 

शिवसेनेच्या प्रचाराची सूत्रं 'निवडणूक रणनीतीचे चाणक्य' म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर सांभाळत आहेत. ज्या पद्धतीने शिवसेना मुद्दे मांडतेय, घोषणा करतेय, आश्वासनं देतेय त्यातून त्यांची तयारी स्पष्ट दिसतेय. त्याचा परिणाम कसा होणार, हे २४ ऑक्टोबरला कळेल; पण आत्ता तरी 'बाण' योग्य दिशेने चाललाय, असं म्हणता येईल.

महत्त्वाच्या बातम्याः

उद्धव ठाकरेंचा 'राज'कीय टोला, 'पुढच्या निवडणुकीत 'ते' फक्त पेपर वाचतील'

'राष्ट्रवादीने 'तो' चोमडेपणा केला नसता तर राज्याचे चित्र वेगळे असते'

माझे अश्रू सांगण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी युती कशी टिकेल हे पाहावं 

त्यावेळी बाळासाहेबांवर खटला का दाखल केला?, उद्धव ठाकरेंचा पवारांना सवाल

कलम 370, राम मंदिरावर उद्धव बोलले पण 'आरे'चं विसरले!

Web Title: Maharashtra Election 2019: Uddhav Thackeray apology may create magic for shiv sena 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.