Maharashtra Election 2019 : लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस असेल '' नॅनो पार्टी '' : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 07:42 PM2019-10-17T19:42:52+5:302019-10-17T19:52:33+5:30
‘साहेबां’च्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी रहायला तयार नाही...
बारामती : ‘‘मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार निवडून आले होते. यंदा २० चा आकडा देखील पार होणार नाही. लोकसभेतच राष्ट्रवादी काँग्रेस ‘नॅनो पार्टी’ झाली आहे. या निवडणुकीत देखील राष्ट्रवादीला ‘नॅनो पार्टी’ बनविणार आहे. ‘नॅनो’ मध्ये बसतात, तेवढीच लोक राष्ट्रवादीची निवडून येणार आहेत. २४ तारखेला निकालादिवशी पेटी उघडल्यावर घड्याळाला शॉक लागून त्याचे बारा वाजले पाहिजेत,’’ अशी टीका मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
बारामती विधानसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ माळेगाव येथे ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, २१ तारखेला मतदान होणार असले तरी निकाल सांगण्यासाठी कोणा राजकीय विश्लेषकाची गरज नाही. पाच वर्षांचे शेंबडे पोर सुद्धा महायुतीची सत्ता येणार असल्याचे सांगेल. ‘साहेबां’च्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी रहायला तयार नाही. ‘साहेब’ म्हणतात, मी पैलवान तयार करतो. मात्र, त्यांच्याकडे एकही पैलवान दिसत नाही. त्यांना स्वत:लाच फिरावे लागत असल्याचे फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ४०० किलोमीटर पाईपलाईन करून पाणी आणले. हे पाणी वापरून त्यांनी कच्छच्या रणात शेती केली. पण, ५० वर्ष राज्य करून देखील पवारांनी या भागाला थेंबभर पाणी दिले नाही. प्रत्येक वर्षी कृष्णा, कोयनेला पुर येतो. याबाबत परीसरात सरकारने वर्ल्ड बँक व एशियन डेव्हलपमेंट बँक यांची २२ लोकांची ‘ग्लोबल एक्सपर्ट टीम ’ पाठवली. तसेच, वाहून जाणाºया पाण्याचा अभ्यास केला. त्यानुसार वाहून जाणाºया पाण्यावर कोणताही लवादामध्ये न अडकणारे पाणी आपल्याला वापरता येईल. आपल्याला कृष्णा-भीमा सारखी स्थिरीकरण योजना राबवून पाणी अडवून पुणे सोलापुर जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी वापरता येईल. जागतिक बँकेने त्यासाठी होकार दर्शविला आहे. राज्यात सरकार आल्यावर बारामतीला टँकरमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, या परिसरात एकही टँकर दिसणार नाही. प्रत्येक शिवारात पाणी आणून दिले जाईल,असा दावा फडवणीस यांनी केला.
भाजप सरकार सत्तेवर आल्यावर पवारसाहेब ''यांना '' शेतीतले काय कळते, असे म्हणायचे. वास्तविक ३१०० रुपयांच्या खाली साखर विकता येणार नाही, असा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला. त्यामुळे एफआरपी देणे शक्य झाले. माळेगावच्या कारखान्याने दिलेला दर तुम्ही का देऊ शकला नाही. इतके कारखाने घेतले, एकही कारखाना चालवू शकला नाही,असा सवाल फडवणीस यांनी केला.
राष्ट्रवादीचे नेते सांगतात आम्हाला ईडीची नोटीस आली आहे. आम्हाला जाणीवपुर्वक फसविले जात आहे. राज्य सहकारी बँकेच्या घोट्या संदर्भात उपलब्ध ‘ऑडिट रिपोर्ट‘ पहा. त्यानंतर अंधेर नगरी चौपट राजा, असे चित्र लक्षात येईल. आपलाच माल आहे,असे समजुन तो वाटण्याचे काम करत बँकेला बुडविण्याचे काम त्यांनी केले. शेतकऱ्यांचे कारखाने जाणीवपूर्वक ‘लॉस’ मध्ये आणून ते कारखाने विकत घ्यायचे. त्यानंतर सरकारची थकीत देणी रद्द करून ते कारखाने कवडीमोल भावाने विकत घ्यायचे,असे अनेक कारखाने ‘पवारसाहेबां’च्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतले. त्याच्याच बद्दल याचिका दाखल झाली. यावेळी कोर्टाने गुन्हा दाखल करण्याच्या सुचना केल्या.‘अजितदादा’ सुप्रीम कोर्टात गेले. त्यामुळे गुन्हा दाखल करा,असे सांगितले. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. त्याच्यावर ईडीची चौकशी सुरु झाली. दादांनी तत्काळ राजीनामा दिला. सकाळी राजीनामा दिला संध्याकाळपर्यंत तो संपला. दुसºया दिवशी साहेबांशी बोलल्यानंतर पुन्हा ‘दादा’ निवडणुक लढण्यास तयार झाले. हे असे घरी बसणार नाही. त्यांना तुम्हाला घरी बसवावे लागेल, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, रंजन तावरे, चंद्रराव तावरे, रंजन तावरे, प्रशांत सातव, कुलभूषण कोकरे, वैष्णवी कोकरे, संदीप चोपडे, राजेंद्र काळे ,अॅड अमोल सातकर यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
-----------
...मुख्यमंत्र्यांना ‘त्या ’वादग्रस्त वक्तव्याची आठवण
५० वर्षांपासून बारामतीची सत्ता असून देखील त्यांना दुष्काळी भागात थेंबभर पाणी देता आले नाही. बरे झाले त्यांनी अजित पवारांना पाणी मागितले नाही, असा टोला लगावत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्या ‘त्या’ वादग्रस्त’वक्तव्याची आठवण काढली.
------------------