तहात हरले! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी? नाशिक, साताऱ्यासह चार जागा घालविल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 07:58 PM2024-04-20T19:58:49+5:302024-04-20T19:59:59+5:30

Ajit pawar NCP News: राष्ट्रवादीला चारच जागा घेऊन लढावे लागत आहे. त्यात देखील दोन उमेदवार उमेदवारीसाठी आयात केलेले आहेत.

Lost in the treaty! Discontent with Ajit Pawar's in NCP? Four seats were lost in Seat Sharing mahayuti including Nashik, Satara loksabha Election | तहात हरले! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी? नाशिक, साताऱ्यासह चार जागा घालविल्या

तहात हरले! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी? नाशिक, साताऱ्यासह चार जागा घालविल्या

शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन राष्ट्रवादी पक्षच ताब्यात घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अस्तित्वाचे युद्ध लढत आहेत. अजित पवार महायुतीत गेले खरे परंतु जागावाटपाच्या तहात बऱ्याच महत्वाच्या जागा गमवाव्या लागल्या आहेत. ओपिनिअन पोलनुसार तर त्यांना बारामतीच्या जागेसह चारही जागा जिंकण्याची शक्यता नाहीय. त्यातच नाशिकची आणि साताऱ्याची जागाही गेल्याने राष्ट्रवादीत अजित पवारांविरोधात नाराजीचा सूर उमटू लागल्याचे वृत्त आहे. 

साताऱ्याची जागा राष्ट्रवादीतून उदयनराजे भोसले लढवत होते. त्यांनी अंतर्गत राजकारणातून पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनाम देत भाजपात प्रवेश केला होता. यानंतरच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला होता. तर राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. तरीही साताऱ्याची जागा राष्ट्रवादीने भाजपला सोडली. 

त्यापूर्वीच्या जागावाटपांच्या चर्चांत गडचिरोली, परभणी सारख्या जागा अजित पवारांनी महायुतीच्या दबावाला बळी पडून सोडल्याची नाराजी आहे. तर साताऱ्याबरोबरच नाशिकमध्येही अजित पवार कमी पडले अशी भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये बळ धरू लागली आहे. दुसरीकडे अजित पवार, तटकरे आणि पटेल हे तिघेच निर्णय घेतात, कोणाला विचारात घेत नाहीत असा सूरही काही जणांमध्ये आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. 

नाशिकच्या उमेदवारीसाठी छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना फोन केला होता. दोघांनीही मोदी आणि अमित शाह यांनी भुजबळांना नाशिकमध्ये उमेदवारी द्या असे सांगितल्याचे म्हटले होते. परंतू, याला १५ दिवस लोटले तरी उमेदवारी जाहीर होत नाही, यामुळे नाराज होऊन भुजबळांनीच दावा मागे घेत असल्याचे जाहीर केले. नाशिक मागण्यात देखील पवार कमी पडल्याचा दावा केला जात आहे.

दुसरीकडे शिंदे गटातही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. शिंदेंचे मंत्री सावंत यांनी काल अजित पवारांसमोरच भर व्यासपीठावर एकेक जागा कमी होऊ लागल्या तर शांत बसणार नाही, असा इशारा दिला होता. या सगळ्यात राष्ट्रवादीची चांगलीच फरपट झालेली दिसत आहे. 

राष्ट्रवादीला चारच जागा घेऊन लढावे लागत आहे. त्यात देखील दोन उमेदवार उमेदवारीसाठी आयात केलेले आहेत. अजित पवारांनी बारामतीत निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने पत्नीला निवडून आणण्यासाठी सर्व ताकद तिकडेच खर्च करावी लागत आहे. कारण अजित पवारांचे कुटुंब एकीकडे आणि शरद पवार व अन्य पवार फॅमिली दुसरीकडे असे झाले आहे. यामुळे सर्व पवार कुटुंबीय अजित पवारांच्या विरोधात प्रचार करू लागले आहेत. चुलते बाजुलाच इथे सख्खेही अजित पवारांच्या विरोधात मत मांडत प्रचार करत आहेत. आता अजित पवार या सगळ्याला पुरून उरणार की अस्तित्व गमावणार यावर येत्या ४ जूनलाच प्रकाश पडणार आहे. 
 

Web Title: Lost in the treaty! Discontent with Ajit Pawar's in NCP? Four seats were lost in Seat Sharing mahayuti including Nashik, Satara loksabha Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.