महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 06:21 AM2024-04-27T06:21:45+5:302024-04-27T06:22:49+5:30

मुंबई शहरात ११२, मुंबई उपनगरात १०२, ठाण्यात १३४ तर पालघरमध्ये ४१ इच्छुकांनी अर्ज नेले

Loksabha Election 2024 - 389 applications sold on first day in Greater Mumbai; Most of the candidates will fill the nomination form after Monday | महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार

महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार

मुंबई, ठाणे, पालघर : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून महिनाभराने महामुंबईत आता खऱ्या अर्थाने मतसंग्रामाला सुरुवात झाली आहे. महामुंबईतील १० लोकसभा मतदारसंघांत शुक्रवारपासून उमेदवारी अर्जांच्या विक्रीला सुरुवात झाली. मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर या मतदारसंघांतून एकूण ३८९ उमेदवारी अर्जांची विक्री नोंदविली गेली. पालघरमधून एक तर कल्याणमधून दोघांनी अर्ज दाखल केले. बहुतांश उमेदवार सोमवारनंतर उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी अपेक्षा आहे.

म्हणून कोटेचा यांनी भरले तीन अर्ज...
कुठल्याही कारणाने अर्ज बाद होवू नये म्हणून मिहीर कोटेचा यांनी तीन उमेदवारी अर्ज भरले आहे. तर, सुषमा मौर्य यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.

पारंपरिक कोळी नृत्य, जोडीला मराठमोळा लूक अशा थाटात उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुंबईतील उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर पहिला अर्ज कोटेचा यांनी दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मावळते खासदार मनोज कोटक यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

‘बविआ’चे राजेश पाटील यांचा अर्ज

पालघर उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी बोईसर विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी लोकसभेसाठी मोजक्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला.  शिट्टी या आपल्या पारंपरिक चिन्हाबाबत पुन्हा काही गोंधळ होऊ नये, यासाठी हा खटाटोप असल्याचे मानले जात आहे. अर्ज दाखल केला असला, तरी आपली उमेदवारी अंतिम नसल्याचे ते म्हणाले

ठाणे ४३, कल्याण ३७, भिवंडी ५४ 

ठाणे/पालघर : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लाेकसभेच्या उमेदवारी अर्जाचे शुक्रवारपासून वाटप सुरू झाले असून, ठाणे लाेकसभेसाठी ४३, कल्याणसाठी ३७ आणि भिवंडीसाठी ५४ अर्ज असे १३४ उमेदवारी अर्जांचे वितरण ठिकठिकाणच्या निवडणूक कार्यालयातून झाले. पालघर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. पालघरमधून ४१ उमेदवारी अर्ज विक्री झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

मुंबईत भाजपच : फडणवीस

मुंबईतील सहाही जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहेत. इथे महविकास आघाडीचे कुठलेही आव्हान दिसून येत नाही. लोकांच्या मनात मोदीजी आहेत आणि तेच आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे. त्यामुळे कोटेचा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मी आमदार आहे... मला सोडा...

मिहिर कोटेचा यांची रॅली निवडणूक कार्यालयाजवळ पोलिसांनी थांबवली. त्या गर्दीत शिंदे गटाचे माजी आ. अशोक पाटील अडकले. ते मिहीर कोटेचा यांच्यासोबत निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाताना त्यांच्यासह काही जणांना अडविण्यात आल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. पाटील यांना ‘‘अहो मी आमदार आहे, मला सोडा’’ असे म्हणत सुटका करत घेतली.

Web Title: Loksabha Election 2024 - 389 applications sold on first day in Greater Mumbai; Most of the candidates will fill the nomination form after Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.