लोकसभेसाठी विधान परिषदेचे लॉलीपॉप; रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी चुरस

By यदू जोशी | Published: April 24, 2024 10:16 AM2024-04-24T10:16:47+5:302024-04-24T10:18:14+5:30

जूनमध्ये होणाऱ्या निवडणुकीवर राज्यातील अनेक इच्छुकांची नजर

Lok Sabha Elections - Aspirants eye on 11 Vidhan Parishad seats to be vacated in the month of June | लोकसभेसाठी विधान परिषदेचे लॉलीपॉप; रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी चुरस

लोकसभेसाठी विधान परिषदेचे लॉलीपॉप; रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी चुरस

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी येत्या जूनमध्ये निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत विविध मतदारसंघांमध्ये राजकीय तडजोडींचा भाग म्हणून बड्या नेतेमंडळींकडून अनेकांना विधान परिषदेचा लॉलीपॉप सध्या दिला जात आहे. 

लोकसभेला आम्हाला मदत करा, विधान परिषदेत तुम्हाला संधी देऊ, असा शब्द दिला जात आहे. एखाद्या स्थानिक नेत्याला विधानसभेत ‘ॲडजेस्ट’ करणे स्थानिक राजकीय परिस्थितीमुळे शक्य नसेल तर त्याला विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन दिले जात आहे. 

विधान परिषदेचे नीचांकी संख्याबळ
विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या ७८ इतकी आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागा अद्याप भरलेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर पाठवावयाच्या नऊ जागा आधीपासूनच रिक्त आहेत. आणखी १० जागा लवकरच रिक्त होणार आहेत. या १० जागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून गेलेले आमदार आणि शिक्षक व पदवीधर मतदारसंघांतून निवडून गेलेल्या आमदारांचा समावेश आहे. 

...तर विद्यमान आमदारांपैकी काहींचा पत्ता कट होणार
काही ठिकाणी संभाव्य बंड थंड करण्यासाठी, काही ठिकाणी ४०-५० हजार मतांची ताकद राखणाऱ्या नेत्याला आपल्या जवळ ठेवण्यासाठी ‘जूनमध्ये विधान परिषदेची निवडणूक आहे, तिथे तुम्हाला संधी देऊ’ असा परस्पर सामंजस्य करार केला जात आहे. ११ आमदारांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत २७ जुलैला संपणार आहे. साधारणत: मुदत संपण्याच्या एक महिना आधी ही निवडणूक होते. हे लक्षात घेता जूनअखेर ११ जागांची निवडणूक होईल. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागेल, त्यानंतर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १० जूनपासून सुरू होणार आहे. या अधिवेशन काळात किंवा ते संपल्यानंतर लगेच विधान परिषदेची निवडणूक होईल. आमदारकीचा शब्द ज्यांना दिला गेला आहे त्यांना खरेच संधी दिली गेली तर सध्याच्या ११ आमदारांपैकी काहींना पुन्हा संधी नाकारली जाऊ शकते. 

काही आमदार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात 

यावेळी काही आमदार लोकसभा निवडणूक लढत आहेत. त्यातील ज्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि तो विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला आहे असे जर लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले तर ते कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसतील. मात्र, लोकसभा लढत असलेल्या बहुतांश आमदारांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. ते जिंकले तर आमदार म्हणून कायम राहायचे की, खासदार म्हणून याचा निर्णय त्यांना नवीन लोकसभेची मुदत सुरू झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत करावा लागेल. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे, ते आता राज्यसभेचे सदस्य आहेत. गोवर्धन शर्मा, अनिल बाबर व राजेंद्र पाटणी या विधानसभा सदस्यांचे निधन झालेले आहे. हे लक्षात घेऊन मतांचा कोटा ठरेल.  

‘या’ आमदारांची २७ जुलै रोजी संपणार मुदत 
बाबा दुर्राणी (अजित पवार गट), वजाहत मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), मनीषा कायंदे (शिंदेसेना), अनिल परब (उद्धवसेना), भाई गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), जयंत पाटील (शेकाप) आणि महादेव जानकर (रासप). 

कसा असतो मतांचा कोटा?
विधानसभेचे आमदार या विधान परिषद निवडणुकीत मतदार असतात. विजयासाठी किती मते मिळवावी लागणार, याचा कोटा निश्चित केला जातो. प्रत्यक्ष मतदानातील वैध मते गुणिले १०० भागिले रिक्त जागा, अधिक २ या सूत्रानुसार हा कोटा निश्चित केला जातो. महायुतीचे विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता ११ पैकी ८ जागा ते जिंकू शकतात. 

Web Title: Lok Sabha Elections - Aspirants eye on 11 Vidhan Parishad seats to be vacated in the month of June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.