महायुतीमधल्या पुढाऱ्यांनी तर बोलूच नये; नारायण राणेंचा उमेदवारीवरून सामंतांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 05:53 PM2024-04-15T17:53:34+5:302024-04-15T17:54:34+5:30
Narayan Rane vs Kiran Samant: भाजपाचा जो कोणी उमेदवार असेल तो प्रचंड मताधिक्याने निवडून यावा. ज्यांनी अडीच वर्षे राज्य केले त्यांनी या कोकणासाठी काहीच केले नाही, असा आरोप नारायण राणे यांनी केला.
राज्याचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ शिवसेना आणि धनुष्यबाणावर लढविणार असल्याचा दावा केला. यावरून नारायण राणेंना उमेदवारी मिळते की सामंत यांना यावरून चर्चा सुरु झालेली आहे. यावर नारायण राणे यांची प्रतिक्रिया आली आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा करून एक महिना लोटला तरी अद्याप महायुतीतील काही जागांचा तिढा सुटलेला नाही. या मतदारसंघांत रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदार संघ देखील आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे किरण सामंत इच्छुक आहेत. तसेच हा मतदारसंघ गेल्या दोन दशकांपासून शिवसेनेकडे होता. राणे काँग्रेसमध्ये गेले तेव्हा तिथून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. परंतु पुन्हा शिवसेनेने राणे पुत्राचा पराभव करत परत मिळविला होता. यामुळे शिवसेनेचा यावर दावा आहे. तर राणे हे देखील भाजपात असल्याने त्यांचाही दावा आहे.
भाजपाचा जो कोणी उमेदवार असेल तो प्रचंड मताधिक्याने निवडून यावा. ज्यांनी अडीच वर्षे राज्य केले त्यांनी या कोकणासाठी काहीच केले नाही. त्यामुळे विकासाचे परिवर्तन व्हावे यासाठी भाजपाचा खासदार निवडून येणे आवश्यक आहे, असे नारायण राणे म्हणाले. तसेच उमेदवार निश्चित होईल. आमचा भाजपाचा कमळाचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही, असे राणे म्हणाले.
किरण सामंतांनी फडणवीसांची भेट घेतल्यावरून राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणीही भेटू शकतो, तुम्हीही भेटू शकता असे सांगत या जागेबाबत सगळे ठरलेले आहे, असे म्हटले. एका व्यक्तीच्या सांगण्याने हा मतदारसंध अवघड आहे असे मी मानत नाही. आम्ही अवघडचे सोप्पे करू एवढी ताकद आमच्यात आहे. कोणी उगाच काही गोष्टी बोलू नयेत. महायुतीमधल्या पुढाऱ्यांनी तर बोलूच नये आणि अपशकुन पण करू नये या मताचा मी आहे, असे राणे म्हणाले.
मोदींची हॅट्ट्रिक होईल. 400 खासदार निवडून येतील. या 400 पारमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गचा हक्काचा खासदार असणारच आणि त्यादृष्टीने प्रयत्न आहेत, असे राणे म्हणाले.