मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

By यदू जोशी | Published: May 19, 2024 11:46 AM2024-05-19T11:46:32+5:302024-05-19T11:47:34+5:30

राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी याबाबत ‘लोकमत’ला माहिती दिली. 

How does the voting percentage suddenly increase? The Election Commission explained | मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

यदु जोशी -

मुंबई : मतदानाच्या टक्केवारीत वाढ झालीच कशी? आधी एक आकडा सांगितला गेला आणि मग आकडा वाढवून दिला गेला, असा एक मोठा आक्षेप सध्या घेतला जात असतानाच आता निवडणूक आयोगाने त्याबाबत आपली बाजू मांडली आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी याबाबत ‘लोकमत’ला माहिती दिली. 

मतदानाच्या टक्केवारीत होणारे बदल याबाबत चर्चा करताना सर्वांनी ही प्रक्रिया नीट समजावून घेऊन मगच त्यावर चर्चा करावी, असे सुचवावेसे वाटते. अन्यथा एखादा गैरसमज, अफवा आणि अज्ञानाचे प्रदर्शन याशिवाय यातून काहीच हाती लागणार नाही, असे कुलकर्णी म्हणाले. 

अंतिम मर्यादेपर्यंत सुरू असते काम...
सर्व मतदान यंत्रे मतदारसंघाच्या मुख्यालयात नेली जातात.  अनेक ठिकाणी मतदान यंत्रे आणि संबंधित कागदपत्रे मतमोजणी केंद्राच्या शेजारी असलेल्या स्ट्राँग रूममध्ये पोहोचायला दुसऱ्या दिवशी सकाळ किंवा अगदी दुपारसुद्धा होते. दरम्यानच्या काळात दूरध्वनी संदेशानुसार घेतलेल्या माहितीच्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत पुन्हा एकदा अंदाजित टक्केवारी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व्होटर टर्नआऊट ॲपवर जाहीर करतात. 

परंतु ती  मतदान संपल्यानंतरची अंदाजित टक्केवारी असते. केंद्राध्यक्षांची डायरी आणि इतर कागदपत्रांवरून खात्री करून जाहीर करण्याची टक्केवारी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत तयार होते आणि लगेचच निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून व्होटर टर्नआऊट ॲपवर टाकली जाते.  राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी संपूर्ण आकडेवारीची माहिती घेऊन खात्री केल्यावरच त्यावर शिक्कामोर्तब होऊन मतदानाची अंतिम टक्केवारी व्होटर टर्नआऊट ॲपवर प्रसारित होते.

त्याला ‘एंड ऑफ पोल’ अंदाजित टक्केवारी म्हणतात. त्यासाठी “मतदानाच्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी रात्री” ही अंतिम समय मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे. म्हणजे मतदानाची अंतिम टक्केवारी सर्व अहवाल, कागदपत्रे तपासून आणि छाननी करून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री जाहीर होते. 

...इथे मिळेत तुम्हाला अधिकृत माहिती 
भारत निवडणूक आयोगाने झालेल्या मतदानाची टक्केवारी सर्वांना कळावी म्हणून ‘व्होटर टर्नआऊट ॲप’ तयार केलेले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल स्टोअरवर अथवा आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यावर मतदानाच्या दिवशी सकाळी ९ नंतर दर दोन तासांनी झालेल्या मतदानाची अंदाजित टक्केवारी जाहीर करण्यात येते. त्यामुळे मतदानाची प्रत्यक्ष  टक्केवारी आणि ॲपवर दिसत असलेली टक्केवारी यामध्ये थोडाफार फरक पडू शकतो, हे स्वाभाविक आहे. या ॲपवर मतदानाची अंदाजित टक्केवारी उपलब्ध होते. 

रात्री ९ पर्यंतही होते मतदान 
- दर दोन तासांप्रमाणे मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५ची अंदाजित टक्केवारी बघता येते. त्यानंतर सायंकाळी ७ला बहुतेक ठिकाणचे मतदान संपत असल्यामुळे पुन्हा एकदा अंदाजित टक्केवारी उपलब्ध होते. परंतु काही मतदान केंद्रांवर  सायंकाळी ६च्या आत म्हणजे मतदानाची वेळ संपण्याच्या आत मतदान केंद्रांवर दाखल झालेल्या मतदारांना टोकन देऊन सर्वांचे मतदान पूर्ण होईपर्यंत मतदान सुरू असते. काही मतदान केंद्रांवर अगदी रात्री ९ पर्यंतसुद्धा मतदान सुरू असते. 
- मतदान संपल्यानंतर सर्व मतदान पथके विधानसभेच्या मुख्यालय असलेल्या ठिकाणी येऊन मतदान यंत्रे, केंद्राध्यक्षांची डायरी व इतर कागदपत्रे सादर करतात. काही मतदान केंद्रे दुर्गम भागात तसेच विधानसभा मुख्यालयापासून दूर असल्यामुळे तेथील मतदान पथकांना 
मुख्यालयी पोहोचण्यास उशीर होतो किंवा कधीकधी पाऊस अथवा वाहतुकीचा अडथळा यामुळे उशीर  होऊ 
शकतो. 

ॲपवरील टक्केवारी अंदाजेच
व्होटर टर्नआऊट ॲपवरील सर्व टक्केवारी अंदाजित असते. कारण, प्रत्येक मतदान केंद्रावर जेव्हा मतदान संपते तेव्हा त्या मतदान केंद्रात झालेल्या मतदानाची संख्या आणि टक्केवारी केंद्राध्यक्षांकडे आणि प्रत्येक मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या राजकीय पक्ष अथवा उमेदवारांच्या प्रतिनिधींकडे केंद्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी सुपुर्द केलेली असते. ती संख्या आणि टक्केवारी हा मूळ आधार असतो. एखाद्या राजकीय पक्षाने प्रतिनिधींकडून केंद्राध्यक्षांच्या स्वाक्षरीनिशी प्राप्त झालेल्या मतदानाची संख्या आणि टक्केवारी याची तुलना केल्यास मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री जाहीर झालेल्या टक्केवारीशी बहुतांश निश्चितपणे जुळेल. 

टपाल मतमोजणी महत्त्वाची
व्होटर टर्नआऊट ॲपमध्ये अंतिम टक्केवारीला अंदाजित असेच म्हटले आहे. त्याचे कारण असे की, ही अंतिम टक्केवारी केंद्राध्यक्षांच्या डायरीशी आणि राजकीय अथवा उमेदवारांच्या मतदान केंद्रातील उपस्थित प्रतिनिधींकडे दिलेल्या संख्येशी जुळत असली तरी मतमोजणीच्या दिवशी त्यामध्ये टपाल मतदानाची संख्या समाविष्ट केली जाते. त्यामुळे मतदानानंतरची मतदानाची संख्या आणि एकूण टक्केवारी यांच्यात किंचित वाढ दिसून येते. त्यामुळे ॲपवर मतदानाच्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दिसणारी अंतिम टक्केवारी ही मतदान यंत्रावरील मतदानाची टक्केवारी असते असेही डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

Web Title: How does the voting percentage suddenly increase? The Election Commission explained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.