नाथाभाऊ भाजपात परतण्याची चर्चा; गिरीश महाजनांचे सूचक भाष्य, म्हणाले, “जेव्हा ते येतील...”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 02:13 PM2024-04-05T14:13:03+5:302024-04-05T14:13:15+5:30
BJP Girish Mahajan News: एकनाथ खडसे भाजपात परतणार असल्याच्या चर्चांवर गिरीश महाजन यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
BJP Girish Mahajan News: गेल्या काही दिवसांपासून भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपात परत येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या चर्चा सुरू असतानाच एकनाथ खडसे यांनी दिल्ली दौरा केला. त्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले, असे सांगितले गेले. या घडामोडींवर भाजपा नेते गिरीश महाजन यांनी सूचक शब्दांत भाष्य केले.
खडसे यांचे कुटुंब नेहमीच संभ्रम निर्माण करते. आताही भाजपमध्ये येणार- येणार अशा चर्चा असल्या, तरी ते येतील, तेव्हा आम्ही आमच्या खास कार्यशैलीने त्यांचे स्वागत करू, असे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ज्यावेळी येतील तेव्हा ठरवू. हे सर्व जर तरचे प्रश्न आहेत. त्याला काहीही अर्थ नाही. अजूनही त्यासंदर्भात कुठलीही वाच्यता नाही. भाजपा प्रवेश करणार, हे समाजमाध्यमांतून आणि प्रसारमाध्यमांतून येत आहे. ते येतील तेव्हा त्यांचे कसे स्वागत करायचे, ते तेव्हाच बघू, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटील आणि रक्षा खडसे यांची भेट घेतली
रावेर मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात एकमेकांविषयी असलेल्या नाराजीबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, त्या दोघांची भेट घेतली. मी त्यांना सांगितले, आपल्याला निवडणुकीत सोबत काम करावे लागेल. महायुतीचा घटकपक्ष म्हणून आपण सोबत आहोत. आपणही शिंदे गटात आहात. चंद्रकांत पाटील आमच्यासोबत आता आहेत. आपण व आपले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणुकीत रक्षा खडसेंसोबत राहावे, असे पाटील यांना चर्चेवेळी सांगितले. आता मला वाटते, त्यांनी ते मान्य केले आहे. त्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम करायचे आहे. मतदान कमळालाच करायचे आहे, अशी ग्वाही दिली. ते गेल्यानंतर रक्षा खडसे यादेखील येऊन भेटल्या, असे महाजन यांनी सांगितले.