नवव्या विश्व मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. गो. बं. देगलूरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 01:14 PM2019-07-13T13:14:39+5:302019-07-13T13:16:25+5:30
यंदाच्या संमेलनासाठी पुरातन स्थापत्यशास्त्र हा विषय केंद्रस्थानी असून या विषयाशी संबंधित विशेष परिसंवाद आणि मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे : विश्व मराठी परिषद आणि शिवसंघ प्रतिष्ठानतर्फे आयोजित नवव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक आणि डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर यांची निवड झाली आहे. कंबोडिया येथील अंग्केरवाट येथे २८ ऑगस्ट रोजी हे संमेलन होणार आहे.
यंदाच्या संमेलनासाठी पुरातन स्थापत्यशास्त्र हा विषय केंद्रस्थानी असून या विषयाशी संबंधित विशेष परिसंवाद आणि मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. कंबोडिया येथील अंग्कोरवाट येथील प्राचीन वैभवशाली मंदिर हे भारतीय स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय नमुना मानले जाते. अशा ठिकाणी याच विषयाशी केंद्रीत राहून होत असलेले संमेलन निश्चित वेगळे ठरेल, अशी माहिती विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष नीलेश गायकवाड यांनी शुक्रवारी दिली.
माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून ज्येष्ठ माध्यमतज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात ' मला भेटलेली माणसं ' हा एकपात्री कार्यक्रम डॉ. मेहेंदळे सादर करणार आहेत.
-----------------------------------------------
मंदिरे आणि मूर्ती भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण : डॉ. गो.बं देगलूरकर
मंदिरे आणि मूर्ती हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मानवी मन, धर्म, तत्त्वज्ञान आणि कलांचा विचार संस्कृतीमध्ये मंदिरे आणि मूर्तीद्वारे अधोरेखित होतो. मूर्ती आमच्या हृदयात आणि देवघरात आहेत, अशी भावना डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केली. अंग्कोरवाट मंदिराचे देशाच्या राष्ट्रध्वजावर आणि चलनी नोटांवर चित्र असलेला कंबोडिया हा जगातील एकमेव देश आहे. कंम्बुज या व्यक्तीवरून देशाला कंबोडिया हे नाव पडले. अंग्कोरवाट मंदिराचा परिसर भव्य असून प्रदक्षिणा घालण्यासाठी काही किलोमीटर अंतर चालावे लागते. रामायण, महाभारत आणि पुराणातील कथा शिल्पाकृतींद्वारे मंदिराच्या भिंतीवर पाहावयास मिळतात, असे देगलूरकर यांनी सांगितले.