रणजीत पाटलांना ‘ते’ मंत्रिपद भोवले? अतिआत्मविश्वास नडला, प्रचार निष्क्रिय

By यदू जोशी | Published: February 4, 2023 11:38 AM2023-02-04T11:38:52+5:302023-02-04T11:50:49+5:30

डॉ. रणजित पाटील यांना तुम्ही आमदार करा, त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद नक्की आहे, असा प्रचार भाजपच्या एक-दोन नेत्यांनी मोठ्या प्रमाणात केला आणि पाटील यांच्या पराभवासाठी त्यांचे हे संभाव्य मंत्रिपद कारणीभूत ठरले, अशी जोरदार चर्चा प्रदेश भाजपच्या वर्तुळात आहे. 

Did Ranjit Patil get 'that' ministerial post? No overconfidence, no propaganda | रणजीत पाटलांना ‘ते’ मंत्रिपद भोवले? अतिआत्मविश्वास नडला, प्रचार निष्क्रिय

रणजीत पाटलांना ‘ते’ मंत्रिपद भोवले? अतिआत्मविश्वास नडला, प्रचार निष्क्रिय

googlenewsNext

- यदु जोशी
मुंबई : डॉ. रणजित पाटील यांना तुम्ही आमदार करा, त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद नक्की आहे, असा प्रचार भाजपच्या एक-दोन नेत्यांनी मोठ्या प्रमाणात केला आणि भाजपच्या अमरावती विभागातील आमदारांच्या भुवया ताणल्या गेल्या. पाटील यांच्या पराभवासाठी त्यांचे हे संभाव्य मंत्रिपद कारणीभूत ठरले, अशी जोरदार चर्चा प्रदेश भाजपच्या वर्तुळात आहे. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पाटील हे गृह, सामान्य प्रशासन आणि नगरविकास अशा अत्यंत महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री होते. ‘फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती’ अशी त्यांची ओळख आहे. फडणवीस या निवडणुकीत अमरावतीला पाटील यांच्या प्रचारासाठी आले तेव्हा त्यांनी भाषणात पाटील यांची प्रशंसा केली. राज्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी खूपच कौतुक केले. इथेच पाटील यांच्याबाबत उद्या हे आमदार झाले तर पुन्हा वर बसतील, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात झाली. 

आ. रामदास आंबटकर हे भाजपचे विधान परिषद सदस्य असून पाटील यांची पक्षपातळीवर प्रचाराची धुरा त्यांच्याकडे होती. पाटील यांचे मंत्रिपद नक्की आहे असे सांगणे त्यांनी सुरू केले. पाटील यांना विजयासाठी मदत व्हावी या हेतूने केलेला हा प्रचार त्यांच्या अंगलट आल्याचे मानले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यातच पाटील विधान परिषदेवर गेले तर त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, मग आपल्या आमदारांची संधी हुकेल, असा विचार भाजप आमदारांच्या समर्थकांमध्ये सुरू झाला आणि त्यातूनच उत्साह निवळू लागला असे बोलले जात आहे. 

डॉ. रणजित पाटील विरुद्ध पूर्ण भाजप असे चित्र अकोला जिल्ह्यात पहिल्यापासूनच आहे. ते कायम राहिल्याचे निकालावरून दिसते. पाटील यांची निष्क्रियता, जुन्या पेन्शन योजनेची जोरदार मागणी, मविआचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी प्रभावीपणे राबविलेली प्रचार यंत्रणा हीदेखील पाटील यांच्या पराभवाची कारणे मानली जातात. 

जितकी मतदार नोंदणी झाल्याचे प्रदेश कार्यालयाला सांगण्यात आले होते, प्रत्यक्षात तितकी नोंदणी खरंच झाली होती का, याबाबत आता शंका व्यक्त केली जात आहे. समांतर यंत्रणा पाटील यांनी राबविल्याने समन्वयाचा अभाव होता, असेही मानले जात आहे.

पक्षाकडून गंभीर दखल
भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची गुरुवारी रात्री बैठक झाली. या पराभवाची गंभीर दखल पक्षाकडून घेतली गेली असून लवकरच पाचही जिल्हाध्यक्षांकडून अहवाल मागविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
मतदारांना गृहित धरले
भाजपचा परंपरागत मतदार हा भाजपच्या दावणीला बांधला गेला आहे, तो जाईल कुठे हा अतिआत्मविश्वास नडला. रा. स्व. संघाची यंत्रणा, भाजपची यंत्रणा आणि पाटील यांच्यात शेवटपर्यंत योग्य ताळमेळ झाला नाही असेही म्हटले जात आहे.

Web Title: Did Ranjit Patil get 'that' ministerial post? No overconfidence, no propaganda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.