“हुकुमशाही मोदी सरकार हटवून इंडिया आघाडीचे सरकार आणा”; रमेश चेन्नीथला यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 09:13 AM2024-04-06T09:13:37+5:302024-04-06T09:13:50+5:30

Congress Ramesh Chennithala: १५ लाख रुपये खात्यात जमा करण्यासह सर्व मोदी गॅरंटी खोट्या निघाल्या, अशी टीका रमेश चेन्नीथला यांनी केली.

congress ramesh chennithala criticize bjp and central govt in rally for lok sabha election 2024 | “हुकुमशाही मोदी सरकार हटवून इंडिया आघाडीचे सरकार आणा”; रमेश चेन्नीथला यांचे आवाहन

“हुकुमशाही मोदी सरकार हटवून इंडिया आघाडीचे सरकार आणा”; रमेश चेन्नीथला यांचे आवाहन

Congress Ramesh Chennithala: देशाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते. पण त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. शेतकरी दररोज आत्महत्या करत आहेत. केंद्र सरकार नोकर भरती करत नाही. कंत्राटी पद्धतीने पदे भरत आहेत. दुसरीकडे लाखो तरुण नोकरीपासून वंचित आहेत. महागाई कमी केली नाही, १५ लाख रुपये खात्यात जमा करणार अशा गॅरंटी दिल्या पण या सर्व मोदी गॅरंटी खोट्या निघाल्या, अशी टीका काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली.

भंडारा गोंदिया लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या भंडारा येथील प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपाने दोन समाजात भांडणे लावून शांतता बिघडवण्याचे काम केले. राहुल गांधी यांनी समाजात एकोपा रहावा, यासाठी भारत जोडो यात्रा काढली. सर्वधर्म समभावाची प्रेरणा घेऊन देश पुढे जात असताना भाजपाने त्याला छेद दिला. देश सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. देशाला कमजोर केले जात आहे. मोदी सरकार पुन्हा आले तर निवडणुकाही होणार नाहीत, हा धोका टाळण्यासाठी मोदी सरकार हटवून इंडिया आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन रमेश चेन्नीथला यांनी केले.

या लोकसभा निवडणुकीतून भाजपाला हद्दपार करा

देशात सत्ता काबीज करण्यासाठी जातींमध्ये भांडणे लावून भाजप दुफळी निर्माण करत आहे. संपूर्ण देशाची लूट करून केवळ उद्योगपतींचे खिसे भरले जात आहे. देशातील सांप्रदायिक वातावरण बिघडवून देश तोडू पाहणाऱ्या भाजपाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेतून हद्दपार करा व देश वाचवा, असे रमेश चेन्नीथला म्हणाले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याची मध्यवर्ती संकल्पना न्याय ही आहे. मागील १० वर्षांत प्रत्येक घटकाचा न्याय धोक्यात आला आहे, कमकुवत झाला आहे तर काही बाबतीत न्याय नाकारलाही आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाने पाच न्याय व २५ गॅरंटी देत देशातील सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा संकल्प असलेले ‘न्यायपत्र’ जाहीर केले आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
 

Web Title: congress ramesh chennithala criticize bjp and central govt in rally for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.