भविष्याच्या चिंतेने जन्मदात्यानेच केली दोन मुलांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 12:06 AM2019-10-10T00:06:49+5:302019-10-10T00:07:09+5:30
साताऱ्याचे रहिवासी चंद्रकांत अशोक मोहिते (३७) याला मुलांच्या हत्येप्रकरणी अटक झाली.
सातारा/मुंबई : क्षयरोगासह दुर्धर आजारामुळे खालावत चाललेली प्रकृती, त्यात पत्नीसोबत होत असलेल्या सततच्या भांडणातून भविष्यात आपल्यानंतर मुलांचे काय होणार? या चिंतेने जन्मदात्यानेच ७ वर्षांच्या मुलासह ११ वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. मुलांचे मृतदेह डिकीत ठेवून तो मुंबईच्या खाडीत उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. त्यापूर्वीच शिरवळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ही धक्कादायक घटना बुधवारी सातारा येथे उघडकीस आली.
साताऱ्याचे रहिवासी चंद्रकांत अशोक मोहिते (३७) याला मुलांच्या हत्येप्रकरणी अटक झाली. चंद्रकांत हा पत्नी, मुलगी गौरवी (११), मुलगा गौरव (७) यांच्यासह घाटकोपरच्या जगदुषानगर येथे राहतो. त्याचा खासगी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्याला दोन वर्षांपूर्वी दुर्धर आजाराचे निदान झाले होते. त्यावरून पत्नीसोबत त्याचे खटके उडत होते. त्यात, औषधांवरील खर्च पेलवत नव्हता. आपल्या मृत्यूनंतर मुलांचा सांभाळ कोण करणार? या विंवचनेतून त्याने यापूर्वी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे त्याच्या भावाने पोलिसांना सांगितले.
दसºयाची सुटी असल्यामुळे चंद्रकांतचा भाऊ हा गावावरून मुंबईला आला होता. त्याला रेल्वे स्टेशनवर सोडून येतो, असे सांगत चंद्रकांतने मुलगी गौरवी आणि मुलगा प्रतीक यांना आपल्या सोबत गाडीत घेतले. भावाला रेल्वे स्टेशनला सोडून आल्यानंतर बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने पत्नीने त्याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्याने मी जवळच आहे, घरी लवकर येतो, असे सांगितले. परंतु बराच वेळ झाला तरी तो आला नाही. काही वेळानंतर त्याने भाऊ सूर्यकांतला फोन केला. ‘मी मुलांना ठार मारून खाडीत आत्महत्या करणार आहे,’ असे त्याने सांगितले. यानंतर भावाने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला आणि शोधाशोध सुरू झाली.
चंद्रकांत मुंबईहून थेट कारने शिंदेवाडी, ता. खडाळा गावच्या हद्दीत रात्री साडेबाराच्या सुमारास पोहोचला. एका कंपनीसमोरील प्रवेशद्वाराजवळ गाडी उभी केली. दोन्ही मुले गाडीत गाढ झोपेत असताना त्याने हाताने गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांना गाडीच्या डिकीत ठेवले व तो मुंबईच्या दिशेने निघाला. त्याच्या गाडीला जीपीएस असल्याने त्याचे लोकेशन पोलिसांना समजत होते. खेड शिवपूर टोलनाका येथे राजगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह पोलीस व टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांनी गाडी थांबविली व या प्रकाराचा उलगडा झाला. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
एका चुकीच्या आकड्याने केला घात
‘मी मुलांना ठार मारून खाडीत आत्महत्या करणार आहे’ असा कॉल चंद्रकांतने भावाला केला. यानंतर भावाने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला आणि त्याचा शोध सुरू केला. चंद्रकांतच्या गाडीला जीपीएस प्रणाली होती. त्याच्या भावाने चंद्रकांतच्या गाडीची इत्थंभूत माहिती मुंबई पोलिसांना दिली होती. मात्र, मुंबई पोलिसांकडून गाडीच्या नंबरचा एक आकडा चुकल्याने त्यांना गाडी टोलनाक्यावर अडवता आली नाही. गाडीचा नंबर बरोबर लिहून घेतला असता तर टोलनाक्यावरच त्याला दोन्ही मुलांसह सहिसलामत पकडता आले असते. परंतु एका चुकीच्या आकड्याने दोन्ही चिमुरड्यांचा घात केला, अशी चर्चा आहे.
मुलांना जबरदस्तीने नेले
चंद्रकांतसोबत मुले जाण्यास
तयार नव्हती. आपण दांडिया पाहून येऊ, असे त्याने मुलांना सांगितले. तरीसुद्धा मुले त्याच्यासोबत जात नव्हती. परंतु त्याने जबरदस्तीने मुलांना गाडीत घेतले आणि शिरवळला आणले, असे पोलीस चौकशीत समोर
आले आहे.