शिवसेना यूपीएत जाणार?; उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सोनिया गांधींच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 10:32 AM2020-02-21T10:32:10+5:302020-02-21T10:51:19+5:30
लोकसभा निवडणुकीवेळी मोदींनी उद्धव ठाकरेंना छोटा भाऊ म्हणून संबोधले होते. यानंतर विधानसभेच्या निकालानंतर राजकीय घडामोडींमुळे शिवसेनेने भाजपाशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करत सरकार स्थापन केले होते. यामुळे भाजपामध्ये वितुष्ट आले आहे.
मुंबई : भाजपाशी काडीमोड घेत मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. आज मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार असून ते काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही भेट घेणार आहेत. दुपारी 12 वाजता ठाकरे दिल्लीला रवाना होणार आहेत. सोनिया गांधींची भेट घेणारे ते ठाकरे घराण्यातील तिसरे असणार आहेत.
लोकसभा निवडणुकीवेळी मोदींनी उद्धव ठाकरेंना छोटा भाऊ म्हणून संबोधले होते. यानंतर विधानसभेच्या निकालानंतर राजकीय घडामोडींमुळे शिवसेनेने भाजपाशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करत सरकार स्थापन केले होते. यामुळे भाजपामध्ये वितुष्ट आले आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे मोदींची भेट घेणार आहेत. यावेळी ते राज्याचा जीएसटीचा वाटा मिळावा, पूरग्रस्तांना मदत मिळावी आदी मागण्या करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतरही डीजी परिषदेच्या निमित्ताने उभयतांची पुण्यात विमानतळावर भेट झाली होती.
मात्र, उद्धव ठाकरे यांची दिल्ली वारी केवळ मोदीभेटीसाठीच चर्चेत नसून उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. याआधी त्यांच्या कार्यक्रमांदरम्यान औपचारिक भेटी झाल्या होत्या. मात्र, आता काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे सरकार बनल्याने ही भेट महत्वाची असणार आहे. उद्धव ठाकरे मोदींना संध्याकाळी ५:३० वाजता भेटणार असून सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी संध्याकाळी ६ वाजता जाणार आहेत. सोनिया गांधींची भेट घेणारे ते ठाकरे घराण्यातील तिसरे असणार आहेत. याआधी गेल्या वर्षी राज ठाकरेंनी सोनिया गांधींची भेट घेतली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला जाणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी औपचारिक असल्याचे सांगण्यात येत असले तरी सोनिया गांधी यांच्या भेटीत शिवसेनेला संपुआत घेण्यावर चर्चा होऊ शकते.
यानंतर आणखी एक महत्वाची भेट ते घेणार आहेत. भाजपाचे गेल्या 6 वर्षांपासून बाजुला केलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची ठाकरे भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेच्या ताणल्या गेलेल्या संबंधांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. अडवाणींच्या निवासस्थानी ते संध्याकाळी ७:३० वाजता जाणार आहेत.