विदर्भात भाजपच्या काही जागा डेंजर झोनमध्ये; बंडखोरीचा फटका बसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 04:59 AM2019-10-16T04:59:23+5:302019-10-16T04:59:57+5:30

पक्षांतर्गत वाद येणार अंगलट : जातीय समीकरणांमुळे सत्त्वपरीक्षा

BJP seats in Danger Zone in Vidarbha; The rebellion will be hit | विदर्भात भाजपच्या काही जागा डेंजर झोनमध्ये; बंडखोरीचा फटका बसणार

विदर्भात भाजपच्या काही जागा डेंजर झोनमध्ये; बंडखोरीचा फटका बसणार

Next

यदु जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २०१४ मध्ये ६२ पैकी तब्बल ४४ जागा जिंकून विदर्भ हा काँग्रेसचा नव्हे तर आपलाच गड असल्याचे भाजपने सिद्ध केले होते. या गडाला यंदा काही तडे जाण्याची दाट शक्यता दिसत आहे. भाजपला काही विद्यमान जागा गमवाव्या लागू शकतात. भाजप-शिवसेनेची पक्षांतर्गत वा एकमेकांच्या मतदारसंघातील बंडखोरी, काही ठिकाणी उमेदवारी वाटपात झालेल्या चुका, काँग्रेसने जुळविलेले जातीपातीचे समीकरण यामुळे भाजपला हातातील मतदारसंघ टिकविणे काही ठिकाणी अवघड जाताना दिसत आहे. तीनचार नवीन जागा भाजपला मिळतील व त्यापेक्षा जास्त जागांवर पाणी सोडण्याची वेळ भाजपवर येऊ शकते, असे चित्र विदर्भात फिरताना जाणवले.


वर्धा शहरात भाजपचे पंकज भोयर विरुद्ध काँग्रेसचे शेखर शेंडे यांच्या लढतीत काहीही होऊ शकते अशी निकराची परिस्थिती आहे. विविध निवडणुकांत हरलेले शेखर शेंडे यावेळी तुल्यबळ लढत देताना दिसतात.
अकोटमध्ये (जि.अकोला) भाजपचे दिग्गज आमदार प्रकाश भारसाकळे यांची डोकेदुखी शिवसेनेचे बंडखोर अनिल गावंडे यांनी वाढविली असून काँग्रेसचे संजय बोडखे यांच्याशी भारसाकळेंची जबरदस्त लढत आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी पूर्ण ताकद भारसाकळेंच्या पाठीशी लावली आहे. अमरावतीमध्ये भाजपचे आमदार डॉ. सुनील देशमुख यांना काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनी त्यांना अडचणीत आणले असल्याचे आजचे चित्र आहे. शेवटच्या क्षणी पक्षसंघटना आणि संघ परिवार देशमुखांच्या पाठीशी कितपत उभे राहतील यावर बरेच काही अवलंबून आहे.


मलकापूरमध्ये भाजपचे चैनसुख संचेती विरुद्ध काँग्रेसचे राजेश एकडे यांच्यात कांटे की टक्कर आहे. जातीय समीकरण आणि लेवा पाटील समाजाची मते हे गणित जुळविण्याचा आटोकाट प्रयत्न एकडे यांनी चालविला आहे. शेवटच्या दिवसात निवडणूक फिरविण्याची क्षमता असलेले संचेती यांना विजयासाठी नेहमीप्रमाणे संघर्ष करावा लागत आहे.


वाशिम जिल्ह्यात भाजप-शिवसेना यांच्यातील दुफळीने महायुती संकटात आहे. रिसोडमध्ये अपक्ष अनंतराव देशमुख यांच्या पाठीशी भाजपचे नेटवर्क असल्याचे चित्र शिवसेना उमेदवारास अस्वस्थ करीत आहे. वाशिममध्ये भाजपचे विद्यमान आमदार लखन मलिक यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या बंडखोराला शिवसेना खासदार भावना गवळी यांची फूस असल्याची चर्चा रंगली आहे. भावनातार्इंचे राजकीय विरोधक कारंजाचे भाजप आमदार आणि उमेदवार राजेंद्र पाटणी यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे प्रकाश डहाके यांच्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते दिसत असल्याने महायुतीतील विसंवाद समोर आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीमध्ये भाजपने उमेदवारी नाकारलेले आमदार राजू तोडसाम यांनी बंडखोरी केली आहे. तिथे भाजपने माजी आमदार संदीप धुर्वे यांना उमेदवारी दिली असून त्यांच्यासमोर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे तगडे आव्हान आहे. ही जागा निवडून आणणे भाजपसाठी कठीण दिसते. उमरखेडमध्ये काँग्रेसचे विजय खडसे पराभवाचा वचपा काढतील, असे बोलले जात आहे. शिवसेनेचे बंडखोर डॉ.विश्वनाथ विणकरे यांनी भाजपचे नामदेव ससाणे यांची चिंता वाढविली आहे. भाजपची वणीतील जागा काहीशी अडचणीत आहे. तिथे विद्यमान आमदार व भाजपचे उमेदवार संजय रेड्डी बोदकुरवार विरुद्ध काँग्रेसचे माजी आ. वामनराव कासावार अशी कांटे की टक्कर आहे. मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रचंड सभेने काँग्रेसच्या तंबूत उत्साह वाढला आहे. तरीही तूर्त भाजप-काँग्रेसची स्थिती ५५-४५ अशी आहे. तेथे श्विसेनेचे २ तर राष्ट्रवादीचे एक बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत. यवतमाळमध्ये राज्यमंत्री मदन येरावार हे काँग्रेसचे बाळासाहेब मांगूळकर यांच्या विरोधात अत्यंत कठीण लढाई लढत आहेत. सामान्यांचा उमेदवार म्हणून मांगूळकर यांना सहानुभूती दिसते. शिवसेनेचे बंडखोर संतोष ढवळे यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.


अमरावती जिल्ह्यातील दयार्पूरचे भाजप आमदार आणि उमेदवार रमेश बुंदिले यांचा निवडणुकीचा पेपर भाजप बंडखोर सीमा सावळे यांनी कठीण केला आहे. तेथे भाजपच्या मतविभाजनामुळे अ‍ॅडव्हान्टेज काँग्रेस दिसते. उत्तर नागपुरात माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत हे भाजपचे विद्यमान आमदार डॉ.मिलिंद माने यांना धक्का देतील, अशी चर्चा असली तरी तेथील चित्र मतविभाजनावर अवलंबून आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोलची जागा भाजपकडे होती. तेथे गेल्यावेळी निवडून आलेले आशिष देशमुख काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध लढत आहेत. गेल्यावेळी काटोलमध्ये पराभूत झालेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख पुन्हा विधानसभेत पोहोचण्याच्या स्थितीत दिसतात. भाजपचे चरणसिंह ठाकूर यांचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.


चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरामध्ये भाजपचे विद्यमान आमदार संजय धोटे, माजी आमदार आणि शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप आणि माजी आमदार व काँग्रेसचे सुभाष धोटे यांच्या पथ्यावर पडू शकते. भंडारा जिल्ह्यात तुमसरची जागा भाजपच्या हातात आहे पण यावेळी ती टिकवताना संघर्ष करावा लागत आहे. कारण, विद्यमान आमदार भाजपचे चरण वाघमारे यांनी बंडखोरी केली आहे. भाजपने प्रदीप पडोळे यांची मते वाघमारे कितपत खातात यावर पडोळे-राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे-वाघमारे यांच्यातील लढतीचा निकाल अवलंबून असेल.

Web Title: BJP seats in Danger Zone in Vidarbha; The rebellion will be hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा